मंत्र्यांना द्यावा लागणार मालमत्तेचा तपशील- योगी आदित्यनाथ
By admin | Published: March 19, 2017 08:38 PM2017-03-19T20:38:22+5:302017-03-19T20:45:50+5:30
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पहिलाच धाडसी निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पहिलाच धाडसी निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना 15 दिवसांच्या आत संपत्तीचा तपशील देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या अजेंड्याखाली काम करण्याचं जनतेला त्यांनी वचनही दिलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्र्यांनी कोणाच्याही भावना दुखावतील अशी वक्तव्यं करू नयेत, असा सल्लाही त्यांनी मंत्र्यांना दिला आहे. राज्यात तरुणांना रोजगार मिळावेत यासाठी मोठे निर्णय घेण्यात येतील. तसेच शेतक-यांना सर्वात पहिली प्राथमिकता देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचा विकास खुंटवण्यासाठी आधीची सरकारं जबाबदार असल्याचा आरोपही आदित्यनाथ यांनी केला आहे.
भाजपा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असेल. भाजपा सरकार उत्तर प्रदेशला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. राज्यातल्या आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचार आणि कौटुंबिक वादाला जनतेपेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. राज्यात भेदभाव न करता विकास करणार असून, उत्तर प्रदेशची कोलमडलेली कायदा-सुव्यवस्थाही लवकरात लवकर सुस्थितीत आणणार आहे. महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणावर भर देण्यात येणार असून, राज्य सरकार उत्तर प्रदेशातील मागास वर्ग आणि गरिबांच्या उत्थानासाठी विशेष काम करणार आहे. शेती, शेतकरी आणि शेतात राबणारे कामगार ही आमची प्राथमिकता आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच जेवण, घर, आरोग्य आणि वाहतूक आदी सुविधांवर सरकार काम करणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये लवकरच सकारात्मक बदल पाहायला मिळणार असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. सरकारी नोक-यांमधली नियुक्ती ही भ्रष्टाचारमुक्त करणार आहे. राज्यात उद्योगांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासनंही त्यांनी दिलं आहे.
Bhrashtachar,khraab kanoon vyavastha se yahan ki janta ko nuksaan pahuncha. Humari sarkaar lok kalyan ke liye kaam karegi:CM Yogi Adityanath pic.twitter.com/PXWXVruovF
— ANI UP (@ANINewsUP) March 19, 2017