देवबंदचे सर्व पासपोर्ट तपासणार, बांगलादेशचे अतिरेकी असल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:55 AM2017-11-01T00:55:26+5:302017-11-01T00:56:27+5:30
पश्चिम उत्तर प्रदेशच्या देवबंदचा पट्टा आणि त्या पलीकडे दिल्या गेलेल्या पासपोर्टसची पुन्हा तपासणी पोलिस करणार आहेत. बांगलादेशच्या अतिरेक्यांनी या भागातून आणखी पासपोर्टस मिळवले आहेत का हे त्यांना तपासायचे आहे.
लखनौ : पश्चिम उत्तर प्रदेशच्या देवबंदचा पट्टा आणि त्या पलीकडे दिल्या गेलेल्या पासपोर्टसची पुन्हा तपासणी पोलिस करणार आहेत. बांगलादेशच्या अतिरेक्यांनी या भागातून आणखी पासपोर्टस मिळवले आहेत का हे त्यांना तपासायचे आहे.
बांगलादेशातील अन्सारुल्लाह बांगला टीम या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेला संशयित अब्दुल्ला याला गेल्या आॅगस्ट महिन्यात मुजफ्फरनगर जिल्ह्यात अटक करण्यात आली. हा दहशतवादी गट अल कायदाकडून प्रेरणा घेतलेला आहे. अब्दुल्ला याने या भागातील पत्त्यावरील प्रवासाची कागदपत्रे सादर केल्याचे दहशतवादविरोधी तुकडीला आढळल्यानंतर देवबंद भागातील सगळ््याच पासपोर्टसची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अब्दुल्लाच्या झालेल्या चौकशीनंतर टाकलेल्या छाप्यांत बांगलादेशातील आणखी काही अतिरेक्यांना सहारनपूर जिल्ह्याच्या या भागातून पासपोर्ट दिले गेले असावेत, असा पोलिसांना संशय आहे.
दारूल उलूम देवबंद हे इस्लामिक शिक्षणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. धर्मनिरपेक्ष लिखाण करणाºयांवर व ब्लॉगर्सवर अनेक प्राणघातक हल्ले केल्याचा आरोप अन्सारुल्लाह बांगला टीमवर आहेत. २०१५ मध्ये या गटाने आंतरराष्ट्रीय ब्लॉगर्स आणि कार्यकर्त्यांची हिटलिस्ट प्रसिद्ध केली होती. त्यात नऊ जण इंग्लडमधील तर दोन अमेरिकेचे होते. सहारनपूर जिल्ह्यातून ज्यांनी पासपोर्ट मिळवला परंतु आता ते तेथे राहात नाहीत अशा लोकांची यादी आम्हाला करायची आहे, असे सहारनपूरचे पोलिस प्रमुख बबलू कुमार यांनी सांगितले.
सात वर्षांपासून अनेक संशयित आढळले
अब्दुल्ला-अल-मेमन याला आॅगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. चौकशीत मेमन २०११ पासून उत्तर प्रदेशात राहतो आहे. सुरवातीला तो देवबंद आणि नंतर मुजफ्फरनगरच्या कुटेसरा भागात राहायचा. फैजन याला अजून अटक झालेली नाही. तो या गटाचा प्रमुख असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. हा गट दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना मानसिकदृष्ट्या तयार करतो व त्यांना आवश्यक ते साह्य करतो. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अनेक दस्तावेजांत बाँब बनवण्याच्या सूचना आहेत, असे पोलिसांनी सांगितले.