डिटेन्शन सेंटर : मृतांची संख्या २९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:18 AM2020-01-05T06:18:19+5:302020-01-05T06:18:23+5:30
आसामातील घुसखोरांना डांबण्यासाठी उघडण्यात आलेल्या ताबा केंद्रात (डिटेन्शन सेंटर) आणखी एका व्यक्तीचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. त्याबरोबर ताबा केंद्रातील मृतांची संख्या आता २९ झाली आहे.
नवी दिल्ली : आसामातील घुसखोरांना डांबण्यासाठी उघडण्यात आलेल्या ताबा केंद्रात (डिटेन्शन सेंटर) आणखी एका व्यक्तीचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. त्याबरोबर ताबा केंद्रातील मृतांची संख्या आता २९ झाली आहे. ताबा केंद्रातील हा व्यक्ती आजारी पडला होता. त्यामुळे त्याला १० दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याच रुग्णालयात आॅक्टोबरमध्येही एका ६५ वर्षीय घुसखोराचा मृत्यू झाला होता.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृताचे नाव दुलाल पॉल असे असून तो सोनीपूर जिल्ह्यातील अलिसिंगा गावचा रहिवासी होता. पॉल हा ११ आॅक्टोबर २०१७ पासून तेजपूरच्या ताबा केंद्रात होता. सूत्रांनी सांगितले की, आसामात सध्या सहा ताबा केंद्रे सुरू आहेत. तथापि, ही ताबा केंद्रे जिल्हा कारागृहातच तयार करण्यात आली आहेत. ताबा केंद्रांत सध्या १ हजार लोकांना ठेवण्यात आले आहे. सातवे ताबा केंद्र गोलपारा जिल्ह्यात स्थापन करण्यात येत आहे.
शासकीय माहितीनुसार, आसामच्या विदेशी नागरिक लवादाने ‘बेकायदेशीर विदेशी व्यक्ती’ घोषित केलेल्या लोकांना ताबा केंद्रात ठेवण्यात आले आहे. मागील तीन वर्षांत ताबा केंद्रातील २८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
>मंत्र्यांनी काय सांगितले?
विधिमंडळ कामकाजमंत्री चंद्रमोहन पाटोवारी यांनी जुलैमध्ये राज्य विधानसभेत सांगितले होते की, आसामातील सहा ताबा केंद्रांत जुलैपर्यंत २५ जण मृत्युमुखी पडले आहेत. यातील फक्त दोन मृतांचा पत्ता बांगलादेशातील असून उरलेल्या सगळ्या मृतांचा पत्ता आसामातीलच आहे. मृतांपैकी कोणाचाही मृतदेह बांगलादेशात पाठविण्यात आलेला नाही.