बापरे! दुधावरची साय झाली गायब अन् सापडलं डिटर्जंट; घरबसल्या 'अशी' ओळखा दुधातील भेसळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 05:37 PM2022-06-02T17:37:17+5:302022-06-02T17:40:17+5:30
दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.
नवी दिल्ली - बाजारात अनेकदा आपल्याला भेसळयुक्त वस्तू पाहायला मिळतात. दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये भेसळयुक्त दूध विकणाऱ्या दूधवाल्यांना लाखो रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. दुधात पाण्यासोबतच डिटर्जंट देखील आढळून आले आहे. जे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या आर्थिक वर्षात दुधाची 207 सॅम्पल घेण्यात आली. त्यापैकी 144 सॅम्पलचे रिपोर्ट आले आहेत. त्यापैकी 56 सॅम्पल फेल झाली आहेत. 16 सॅम्पलमध्ये डिटर्जंटचे अंश आढळून आले आहेत. तर 40 सॅम्पलमधून दुधाची साय गायब होती.
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अर्चना धीरान यांनी याबाबत माहिती दिली आहे.विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा दुधाचा पुरवठा कमी होतो तेव्हा मागणी पूर्ण करण्यासाठी दुधात पाण्याची आणि डिटर्जंटची भेसळ वाढते. दुधाचे नमुने वेळोवेळी घेतले जातात. दुधाचे महत्त्व लोकांना जागृत करण्यासाठी दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केला जातो. घरबसल्या आपण स्वतः दुधाची चाचणी करू शकता जाणून घेऊया...
घरी अशी करा दुधाची चाचणी
एखाद्या चमकणाऱ्या पृष्ठभागावर दूधाचा एक थेंब टाकला तर तो थेंब घरंगळत पुढे जातो आणि मागे त्याच्या पांढऱ्या खुणा दिसतात. परंतु, जर दुधात पाणी मिसळलेलं असेल तर ते दूध लवकर घरंगळत पुढे जातं आणि पांढऱ्या खुणा दिसत नाहीत.
टिंक्चर आयोडिनचे (Tincture Iodine) काही थेंब टाकल्यावर स्टार्च असलेल्या दुधाला निळा रंग येतो. टिंक्चर आयोडिन औषधाच्या दुकानात सहज मिळतं.
दुधात युरियाच्या भेसळीची तपासणी करण्यासाठी परीक्षानळीमध्ये थोडं दूध घेऊन त्यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर पावडर टाकून पाच मिनिटं ठेवा. यानंतर लाल लिटमस पेपर (Red litmus paper) दुधात बुडवल्यानंतर लाल कागदाचा रंग निळा झाल्यास दुधात युरियाची भेसळ असल्याचं स्पष्ट होतं. स्टेशनरीच्या दुकानात रेड लिटमस पेपर मिळतो.
दुधात तेलाची भेसळ तपासण्यासाठी एका परीक्षानळीमध्ये तीन ते पाच मिलिलिटर दूध घेऊन त्यात हायड्रोक्लोरिक अॅसिडचे 10 थेंब आणि एक चमचा साखर (Sugar) टाका. पाच मिनिटांनी त्यात लाल रंग दिसू लागल्यास दुधात भेसळ केल्याचं स्पष्ट होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.