दुचाकींचेही आयुष्य ठरवणार; केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरींची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 02:38 AM2019-09-12T02:38:36+5:302019-09-12T02:38:55+5:30
दुचाकी वाहने मोडीत निघाल्यानंतर त्यांच्या सुट्या, पण चांगल्या स्थितीत असलेल्या भागांचा पुनर्वापर करता आला, तर लोकांना कमी किमतीत दुचाकी वाहने उपलब्ध होऊ शकतील.
संतोष ठाकुर
नवी दिल्ली : चारचाकी वाहनांप्रमाणेच दुचाकी वाहने किती काळात मोडीत काढावीत, याबाबतही केंद्र सरकार धोरण निश्चित करीत असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. त्या धोरणानुसार दुचाकी वाहनांचे आयुष्य निश्चित करण्यात येईल.
एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, दुचाकी वाहने मोडीत निघाल्यानंतर त्यांच्या सुट्या, पण चांगल्या स्थितीत असलेल्या भागांचा पुनर्वापर करता आला, तर लोकांना कमी किमतीत दुचाकी वाहने उपलब्ध होऊ शकतील. कोणीही कंपनी यासाठी मोडीतील वाहनांसाठी क्रॅश सेंटर उभारण्यासाठी पुढे आली, तर सरकार तिला मदत करेल. ते म्हणाले की, दिल्लीसारख्या शहरांमध्ये प्रदूषण ही मोठी समस्या असल्याने बीएस-६ मानके असलेल्या स्कूटर वरदान ठरू शकतील. यांचे वैशिष्ट्य म्हणजे बीएस-४ मानकांच्या पेट्रोलवर इंजिन न बिघडू देता नीट धावू शकतात. बीएस-६ साठीचे पेट्रोल अद्याप उपलब्ध व्हायचे आहे. अर्थात तसे पेट्रोल लवकरात लवकर उपलब्ध व्हावे, यासाठी आपण पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा केली आहे. ग्रामीण भागांत इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे पंप सुरू व्हावेत, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. ते म्हणाले की, ग्रामीण भागांमध्ये अन्नधान्यांचा टाकाऊ भाग, खराब झालेल्या भाज्या व फळे तसेच ऊ स यांपासून इथेनॉल बनविणे शक्य आहे.