PM मोदी यांचे देवदर्शन; पारंपरिक तामिळी वेशभूषा परिधान, मंदिरातील हत्तीला भरवला खाऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 08:14 AM2024-01-21T08:14:48+5:302024-01-21T08:15:17+5:30

मोदी यांनी वेष्टी (धोती), अंगवस्त्रम (शाल) अशी वेशभूषा केली होती. त्यांनी श्री रंगनाथस्वामींचे दर्शन घेतले.

Devdarshan of PM Modi; Dressed in traditional Tamil attire, feed the temple elephant | PM मोदी यांचे देवदर्शन; पारंपरिक तामिळी वेशभूषा परिधान, मंदिरातील हत्तीला भरवला खाऊ

PM मोदी यांचे देवदर्शन; पारंपरिक तामिळी वेशभूषा परिधान, मंदिरातील हत्तीला भरवला खाऊ

तिरुचिरापल्ली : अयोध्येतील राममंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तामिळनाडूतील श्री रंगम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. त्यांनी यावेळी पारंपरिक तामिळी वेशभूषा परिधान केली होती.

मोदी यांनी वेष्टी (धोती), अंगवस्त्रम (शाल) अशी वेशभूषा केली होती. त्यांनी श्री रंगनाथस्वामींचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिरातील हत्तीला खाऊ घातले. यावेळी मोदींना मंदिराच्या पुजाऱ्यांनी भगवान विष्णूच्या आशीर्वादाचे प्रतीक असलेला मुकुट भेट म्हणून दिला. वैष्णव संत-गुरू श्री रामानुजाचार्य आणि श्री चक्करथळवार यांना समर्पित केलेल्या ‘सन्नाधी’त (देवतांसाठी असलेले स्वतंत्र कक्ष) प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकृष्ण मठम येथे शनिवारी रात्री मुक्काम करणार असून उद्या, रविवारी धनुषकोडी येथे ते जाणार आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधानांनी व्रत राखले असून भगवान रामाशी संबंधित देशभरातल्या महत्वाच्या मंदिरांना ते भेटी देत आहेत.

वैष्णव पंथीयांचे प्राचीन मंदिर

श्रीरंगम हे वैष्णव पंथीयांचे तामिळनाडूतील प्राचीन मंदिर आहे. विविध राजवटींमध्ये या मंदिराचा विस्तार झाला आहे. चोल, पांड्य, होयसळ आणि विजयनगरच्या राजांनी या भव्य मंदिराच्या बांधकामात महत्त्वाचे योगदान दिले होते. श्रीरंगम मंदिर कावेरी आणि कोल्लीडम नद्यांच्या संगमावर एका बेटावर वसलेले आहे.

मंदिराला ‘बुलोगा वैकुंठम’ किंवा ‘पृथ्वीवरील वैकुंठम’ असेही म्हणतात. वैकुंठ हे भगवान विष्णूचे  निवासस्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी चेन्नईहून श्रीरंगम मंदिरात आले. स्वागताला आलेल्या लोकांना त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी लोकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम येथील अरुलमिगू रामनाथस्वामी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. 

मंदिरात देवदर्शन, समुद्रकिनाऱ्यावर स्नान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्याआधी अग्नितीर्थ या समुद्रकिनाऱ्यावर स्नान केले. तामिळनाडूतील प्राचीन मंदिर असलेल्या रामनाथस्वामी मंदिरात जाताना मोदी यांनी रुद्राक्ष माळ घातली होती. तिथे त्यांनी भजनातही सहभाग घेतला.

Web Title: Devdarshan of PM Modi; Dressed in traditional Tamil attire, feed the temple elephant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.