आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात ईशान्येचा विकास करणार
By Admin | Published: February 21, 2015 03:48 AM2015-02-21T03:48:12+5:302015-02-21T03:48:12+5:30
ईशान्य क्षेत्रातील कृषी उत्पादन वाढविण्यासाठी या क्षेत्राचा आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात विकास करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
इटानगर : ईशान्य क्षेत्रातील कृषी उत्पादन वाढविण्यासाठी या क्षेत्राचा आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात विकास करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासोबतच दीर्घकाळापासून उपेक्षित असलेल्या या भागात २-जी, ३-जी आणि ४-जी कनेक्टिव्हिटी अधिक चांगली बनविण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
ईशान्येकडील राज्यांबाबत केंद्र सरकार अधिक सक्रिय आहे आणि देशाच्या अन्य भागांप्रमाणेच या भागांच्या विकासासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे मोदी म्हणाले. अरुणाचल प्रदेशच्या २९ व्या स्थापना दिवस समारंभात मोदी बोलत होते. ते म्हणाले, उपयुक्त कृषी वातावरण लक्षात घेऊन कृषी आणि फलोद्यानाच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी ईशान्य भागाचा देशाच्या आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात विकास करण्याची केंद्राची योजना आहे. ईशान्य भागांत सहा नवी कृषी विद्यापीठे स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे.
‘ईशान्य भागांत १८ नवे एफएम चॅनल्स सुरू करण्याची माझ्या सरकारची योजना आहे. त्यासाठी लवकरच लिलावाची प्रक्रिया प्रारंभ करण्यात येईल. विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आणि या भागांतील जनतेच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी ईशान्येकडील राज्यांना महिन्यातून दोन वेळा भेट देण्याचे निर्देश आपण आपल्या सर्व मंत्र्यांना दिलेले आहेत,’ असे मोदी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)