कटू सत्य ऐकण्याची सवय करा; स्वामींचा मोदींना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 10:05 AM2019-10-01T10:05:33+5:302019-10-01T10:08:00+5:30
अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरुन थेट पंतप्रधानांवर निशाणा
मुंबई: कटू सत्य ऐकण्याची तयारी ठेवा आणि प्रशासनातील अर्थतज्ज्ञांना घाबरवणं सोडा, अशा शब्दांमध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरचा अहेर दिला आहे. देश आणि अर्थव्यवस्था चालवायची असल्यास ऐकून घेण्याची वृत्ती असायला हवी. मात्र मोदींनी अद्याप तशी सवय करुन घेतलेली नाही, असं स्वामी म्हणाले. स्वामी यांनी याआधीही देशातील अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
'मोदींच्या कामाची पद्धत पाहता खूपच कमी व्यक्ती त्यांच्यासमोर बोलू शकतात. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना मनमोकळेपणानं त्यांचे विचार मांडता यावेत यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. मात्र अद्याप मोदींनी अशी सवय लावून घेतलेली नाही,' अशा शब्दांमध्ये स्वामींनी मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. देशाची अर्थव्यवस्था मंदीसदृश्य अवस्थेतून जात असताना स्वामींनी मोदींवर निशाणा साधला आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारनं कॉर्पोरेट करात कपात केली आहे. याशिवाय आणखीही पावलं उचलली आहेत. मात्र अद्याप याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसलेले नाहीत.
नोटबंदी आणि घाई गडबडीत लागू करण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर अर्थव्यवस्थेतील मंदीला कारणीभूत असल्याचं स्वामी म्हणाले. रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय नेमक्या समस्यांवर काम करत नसल्यानं अर्थव्यवस्थेसमोरील संकट अधिक गहिरं होत असल्याचंही ते म्हणाले. 'अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्रिस्तरीय प्रयत्नांची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घ काळासाठी स्वतंत्र धोरणं आखायला हवीत. मात्र सध्या अशी कोणतीही धोरणं अस्तित्वात नाहीत. पंतप्रधानांना अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती सांगण्याची हिंमत प्रशासनातील एकही अर्थतज्ज्ञ करत नसेल. कारण मोदींना कटू सत्य ऐकण्याची सवय नाही,' असं स्वामी यांनी म्हटलं.