‘विकसित भारत’ हेच लक्ष्य; २०४७ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धावत असल्याचे PM मोदींचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 06:00 AM2024-03-11T06:00:00+5:302024-03-11T06:00:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील तीन कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा संकल्प केला आहे.
रायपूर/आझमगड : आज माझ्या विकासाच्या अनंत प्रवासाची मोहीम आहे आणि मी २०४७ पर्यंत भारताला ‘विकसित भारत’ बनवण्यासाठी धावत असून, देशाला वेगवान बनविले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी सरकारांवर हल्लाबोल करताना म्हटले आहे.
‘डबल इंजिन’ सरकारचे प्राधान्य महिलांचे कल्याण आहे, असे सांगत मोदी यांनी रविवारी छत्तीसगडमध्ये महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ‘महतारी वंदन’ योजनेचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले.
मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील तीन कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा संकल्प केला आहे. महतारी वंदन योजनेंतर्गत आम्ही ७० लाखांहून अधिक महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते आणि आज भाजप सरकारने ते पूर्ण केले आहे
लांगुलचालनाचे विष विकासामुळे उतरत आहे
उत्तर प्रदेशने विकासाच्या नवीन शिखरांना स्पर्श केल्याने लांगुलचालनाचे विष उतरत आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये आझमगड येथे मुलायम-अखिलेश यादव यांच्याशी संबंध असलेल्या मतदारसंघातील घराणेशाहीवर टीका केली.
३४ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरातील ४२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. यापैकी ३४,७०० कोटी रुपयांचे प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यापैकी बहुतांश विमानतळ व इमारतींचा समावेश आहे.