देशवासीयांत विश्वास निर्माण केला - नरेंद्र मोदी
By admin | Published: September 5, 2016 04:12 AM2016-09-05T04:12:28+5:302016-09-05T04:12:28+5:30
आपल्या सरकारने देशवासीयांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.
नवी दिल्ली : आपल्या सरकारने देशवासीयांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. जागतिक पातळीवरील आर्थिक संस्थांनीही भारताच्या प्रगतीची दखल घेतली. सव्वाशे कोटी भारतीयांच्या जीवनात सुधारणा करण्यास आपण व आपले सरकार कटिबद्ध आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
‘नेटवर्क-१८’ या वाहिनीचे समूह संपादक राहुल जोशी यांनी पंतप्रधानांची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. ही मुलाखत नेटवर्क-१८च्या विविध वाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आली. आयबीएन लोकमत, आयबीएन-७, सीएनएन-आयबीएन आणि सीएनबीसी यांचा त्यात समावेश आहे. या मुलाखतीत मोदी यांनी बहुआयामी प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
सरकारच्या कामगिरीबद्दल मोदी म्हणाले की, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, विविध मानक संस्था आणि संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटना या सर्वांनी भारत वेगाने प्रगती करीत आहे, असे म्हटले आहे. व्यवसायातील अडथळे आम्ही दूर केले आहेत. शेतीसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. त्यातच यंदा पाऊस चांगला असल्यामुळे कृषी क्षेत्राच्या वाढीला हातभार लागला आहे. विजेचे उत्पादन वाढले आहे. पायाभुत क्षेत्रात मोठे काम सुरू आहे. आम्ही १९व्या आणि २०व्या शतकातील १७०० कालबाह्य कायदे रद्द केले आहेत. राज्यांनाही तशाच सूचना आम्ही दिल्या आहेत. आम्ही शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले आहे. १० सरकारी आणि १० खासगी विद्यापीठांना आम्ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांतून सूट दिली आहे. पण, लोकांचे या कामांकडे लक्षच जात नाही.
आम्ही काम करीत आहोत
काही प्रश्न अजून सुटायचे आहेत हे खरे आहे. उदाहरणार्थ बँकांच्या बुडीत कर्जाची समस्या अर्थव्यवस्थेला भेडसावते आहे. करपद्धतीमध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे. संघ राज्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. आम्ही त्यावर काम करीत आहोत.
गेल्या दोन वर्षांकडे तुम्ही कसे पाहता, असा प्रश्न जोशी यांनी विचारल्यानंतर मोदी हसत म्हणाले, पंतप्रधानपदाची जबाबदारी मिळण्यास दोन वर्षे आणि तीन महिने झाले. सरकारच्या कामाचे लोकांसह विविध पातळ्यांवर मूल्यमापन केले जाते व ही चांगली बाब आहे. माझ्या सरकारचे मूल्यमापन लोकच करतील. मात्र, हे सरकार सत्तेवर येण्यापूर्वीची परिस्थितीही लक्षात घ्यावी, असा माझा आग्रह असेल. तेव्हाची परिस्थिती डोळ्यांसमोर आणून बघा. वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी व्यापले होते. लोकांची आशा संपुष्टात आली होती. मला लोकांच्या मनात विश्वास निर्माण करायचा होता. कारण, डॉक्टर कितीही हुशार असला तरी रुग्णाचा औषधावर विश्वासच उरला नसेल तर तो बरा होणार नाही आणि रुग्ण आशावादी असेल तर साधारण डॉक्टराचाही त्याला गुण येऊ शकतो. त्यामुळेच सरकार स्थापन केल्यानंतर मी लोकांमध्ये विश्वास जागविण्यास प्राधान्य दिले. आज मी असे ठामपणे म्हणू शकतो की केवळ देशवासीयांचा विश्वासच वृद्धिंगत झाला असे नाही तर संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास वाढला आहे. हे केवळ भाषणबाजीने होत नाही. त्यासाठी पावले उचलावी लागतात. ते आम्ही केले.
भरपूर प्रयत्नानंतर जीएसटी संमत करून घेण्यात यश मिळाले. काही जण कर भरतात कारण त्यांना कायद्याच्या कचाट्यात सापडायचे नसते. कराची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यामुळे बहुतांश लोक कर भरत नाहीत. जीएसटी कर प्रक्रियेचे सुलभीकरण करणार असून, त्यामुळे देशासाठी योगदान देऊ इच्छिणारा कोणीही समोर येऊ शकेल, असेही मोदी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
न्याय व्यवस्थेसोबत संघर्ष नाही
न्यायालयासोबतही आपले संबंध तणावपूर्ण राहिले आहेत, असे निदर्शनास आणून दिले असता, मोदी म्हणाले की, ही चुकीची धारणा आहे. आपले सरकार नियम, कायदे आणि घटनेनुसार चालले आहे. न्यायव्यवस्थेसोबत संघर्षाला जागाच नाही. न्यायव्यवस्थेचा योग्य सन्मान करण्यासाठी मी माझ्या परीने सर्व शक्य प्रयत्न करीत असतो.
या मुलाखतीत मोदी यांना काही वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्नही विचारण्यात आले. शक्तिशाली नेता अशी प्रतिमा असताना अनेकदा तुमच्या व्यक्तिमत्त्वातील हळवा पैलूही समोर येतो. मोदी नेमके कसे आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले, सीमेवर लढताना जवान वज्रासारखा कठोर असतो; पण तोच जवान आपल्या मुलीशी अत्यंत मृदूपणाने वागतो. देशवासीयांच्या कल्याणार्थ कठोर निर्णय घ्यायचे असतील, तर मी ते घेतो. पण जेथे मृदू होणे आवश्यक आहे, तेथे मी मृदू होतो. त्यात खरा मोदी आणि खोटा मोदी असे काही नाही.
>मोदींच्या व्यक्तिमत्त्वावरील मराठी प्रभाव
आपल्या जीवनात सर्वाधिक प्रभाव कोणाचा आहे, असा प्रश्न विचारला असता, मोदी यांनी बडोद्याचे मराठी संस्थानिक गायकवाड यांचे नाव घेतले. ते म्हणाले की, माझे गाव गायकवाड राजांच्या संस्थानात होते. गायकवाडांनी गावोगावी शाळा, वाचनालये उभारली. गरिबांची मुले त्यांच्या शाळांत शिकत.
शिक्षक काळजीपूर्वक लक्ष देत. या वातावरणात मी घडलो. लहानपणीच मला वाचनाची आवड लागली. पुस्तकांनी माझ्या आयुष्यावर मोठा
प्रभाव पाडला. आता वाचायला वेळ मिळत नाही. वयाच्या १२व्या वर्षी
मी वक्तृत्व स्पर्धांत भाग घेऊ लागलो होतो. विवेकानंदांची वचने आणि त्यांची भाषणशैली मला आवडत असे. विवेकानंदांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव होता. आजही तो कायम आहे.
>आपल्यातला माणूस पंतप्रधान झाला
मीडियासोबतच्या कडू-गोड संबंधांबाबत मोदी म्हणाले की, मी संघटनात्मक कार्यात होतो. त्यामुळे बहुतांश सर्व मोठ्या पत्रकारांसोबत माझे उठणे-बसणे
होते. पंतप्रधानपदावर मोठी-मोठी मंडळी बसलेली पत्रकारांनी पाहिलेली आहेत. आपल्यासोबत वावरलेला माझ्यासारखा माणूस पंतप्रधान झाल्यावर पत्रकारांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. तथापि, मी मसालेदार वक्तव्ये करीत नाही. त्यामुळे त्यांची जरा निराशा झाली आहे. मी मीडियाच्या टीकेचे स्वागतच करतो. मीडियाने सरकारचे टीकाकारच असले पाहिजे.
>लुटियन्स दिल्लीने सर्वांचीच खिल्ली उडविली
लुटियन्स दिल्लीमधील लोकांना तुम्ही आवडत नाही आहात. तुम्हाला दिल्ली आवडते का, या प्रश्नावर मोदी म्हणाले की, लुटियन्स दिल्लीच्या आवडी-निवडीने काही फरक पडत नाही. या लोकांनी शेतकऱ्यांचे नेते सरदार पटेल, समर्पित नेते मोरारजी देसाई, महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधानपदी चढलेला शेतकऱ्यांचा मुलगा देवेगौडा यांची खिल्ली उडविली. मोरारजी काय पितात, याची ते चर्चा करीत. देवेगौडा यांची झोपच त्यांना दिसत असे. आंबेडकरांची तर त्यांनी टिंगल केली. पण या महान लोकांनी उपसलेल्या कष्टाकडे त्यांनी कधी लक्ष दिले नाही. त्यामुळे हे लोक जेव्हा माझी खिल्ली उडवितात तेव्हा मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. या देशातील मातीत ज्यांची मुळे रुतलेली आहेत, त्यांच्याबद्दल या लोकांनी कधीच आदर दाखविला नाही. दिल्लीपेक्षा गरिबांसोबत राहणे मी पसंत करीन.
-राहुल जोशी
समूह संपादक ‘नेटवर्क-१८’