अजिंठा लेण्यांचा होणार विकास, देशातील १४ ठिकाणे करणार विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 06:57 AM2017-10-27T06:57:35+5:302017-10-27T06:57:39+5:30
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘वारसास्थळ दत्तक योजने’अंतर्गत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचा विकास व संवर्धन करण्याची संकल्पना लवकरच साकार होणार आहे.
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘वारसास्थळ दत्तक योजने’अंतर्गत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचा विकास व संवर्धन करण्याची संकल्पना लवकरच साकार होणार आहे. यात्रा आॅनलाइन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची त्यासाठी निवड झाली आहे.
‘पर्यटन पर्व’च्या समारोपप्रसंगी १४ स्मारकांच्या संवर्धनासाठी ७ कंपन्यांची निवड करण्यात आली. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेण्यांच्या विकास व संवर्धनाचे काम यात्रा आॅनलाइन कंपनीला देण्यात आले. ही कंपनी ‘स्मारक मित्र’ म्हणून ओळखली जाणार असून सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) फंडातून ही कंपनी अजिंठा लेण्यांच्या ठिकाणी पर्यटनाच्या वृद्धीसाठी पूरक सोयी व सुविधा उपलब्ध
करून देईल.
>आश्चर्याने थक्क करणा-या गुंफा
एकूण १४ स्मारकांच्या विकासासाठी खासगी कंपन्यांना आवाहन केले होते. त्यासाठी ५७ कंपन्यांनी अर्ज केले. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी इ.स. पूर्व २00 ते ६५0 या कालखंडातील कोरीव कामाची शिल्पकला व रंगीत भित्तिचित्रासाठी प्रसिद्ध आहेत. अजिंठा लेणी स्थळावर भगवान बुद्धाच्या जीवनातील कोरलेले प्रसंग, बौद्ध मंदिरे, गुंफा इत्यादी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आश्चर्याने थक्क करणारे आहेत.
अन्य १३ स्मारकांचा वारसास्थळांमध्ये दिल्लीतील जंतरमंतर, कुतुब मिनार, सफदरजंग कबर, अग्रसेन बावडी, पुराना किला तसेच कोणार्कचे सूर्यमंदिर, भुवनेश्वरचे राजाराणी मंदिर, ओडिशातील रतनगिरी स्मारक, कर्नाटकातील हंपी, जम्मू-काश्मीरमधील लेह राजवाडा, लडाखचे स्टॉक कांगरी, कोचीचे मत्तानचेरी राजवाडा संग्रहालय, उत्तराखंडातील गंगोत्री मंदिर व गौमुखातील त्रिभुज प्रदेश यांचा समावेश आहे.