विकासाची बुलेट ट्रेन - पंतप्रधान मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 05:30 AM2017-09-15T05:30:24+5:302017-09-15T05:31:06+5:30
महागड्या बुलेट ट्रेनची गरज काय आहे, असा सवाल विचारला जात असला तरी मुंबई ते अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन जवळपास फुकटातच मिळाली आहे, हे लक्षात घ्यावे. ही ख-या अर्थाने आर्थिक विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते बुलेट ट्रेनचा भूमिपूजन समारंभ साबरमती येथे पार पडल्यानंतर ते सभेत बोलत होते.
अहमदाबाद : महागड्या बुलेट ट्रेनची गरज काय आहे, असा सवाल विचारला जात असला तरी मुंबई ते अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन जवळपास फुकटातच मिळाली आहे, हे लक्षात घ्यावे. ही ख-या अर्थाने आर्थिक विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते बुलेट ट्रेनचा भूमिपूजन समारंभ साबरमती येथे पार पडल्यानंतर ते सभेत बोलत होते.
बुलेट ट्रेनसाठी १ लाख १0 हजार कोटी रुपये खर्च येणार असला तरी त्यासाठी ८८ हजार कोटी रुपयांचे कर्ज भारताला 0.0१ टक्के इतक्या कमी व्याजाने म्हणजे जणू शून्य टक्के दरानेच मिळते आहे. इतक्या कमी टक्क्याने एवढे मोठे कर्ज कुठेही मिळणार नाही, याचा उल्लेख करीत पंतप्रधानांनी त्यासाठी शिंजो आबे यांचे आभारही मानले. तसेच २0२२ साली या ट्रेनच्या उद्घाटनाची संधी मला व आबे यांनाच मिळेल, अशी आशाही व्यक्त करीत, या ट्रेनमुळे भारत व जपानमधील मैत्री अधिक घट्ट होईल, असे ते म्हणाले.
बुलेट ट्रेन १२ स्टेशनांवर थांबत सुमारे पावणेतीन तासांत मुंबई ते अहमदाबाद हे अंतर पूर्ण करेल. अहमदाबादहून विमानाने मुंबईला जायचे ठरविले तर दोन्ही विमानतळांवरील सारे उपचार पुरे करेपर्यंत जितका वेळ लागतो, त्यापेक्षा हा वेळ कमी असेल. म्हणजेच बुलेट ट्रेनमुळे वेळ वाचेल, रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल, त्यामुळे प्रदूषण कमी होईल. या सर्वांपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे ही दोन शहरे ‘सिंगल इकॉनॉमिक झोन’ म्हणून विकसित होऊ न दोन्ही राज्यांच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल, असेही ते म्हणाले.
मेक इन इंडियाला मजबुती
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रकल्पामुळे मेक इन इंडिया योजनेला मजबुती मिळेल आणि लोकांसाठी रोजगार उपलब्ध होतील, असा दावा करून, ही बुलेट ट्रेन जपान आणि भारतातील लोकांमधील बंधुत्वाचे प्रतीक आहे, असे सांगितले.
ऐतिहासिक दिवस - फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्र वा गुजरातसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक आहे. या बुलेट ट्रेनमुळे आधुनिक भारताचा पाया रचला जात आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही या वेळी भाषण झाले.
जय जपान, जय इंडिया - शिंजो आबे
शंजो आबे यांनी भाषणाची सुरुवात ‘नमस्कार’ने केली. जपानचा 'जे' व इंडियाचा 'आय' एकत्र केल्यास 'जय' शब्द निर्माण होतो, असे सांगून त्यांनी 'जय जपान, जय इंडिया'चा नारा दिला.
आपणास गुजरात हे राज्य आणि येथील पाहुणचार खूप आवडला, असे सांगतानाच शिंजो आबे यांनी पुढच्या वेळी मी बुलेट ट्रेनमधून नरेंद्र मोदींसोबत प्रवास करेन, असे नमूद केले. त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट 'धन्यवाद'ने केली.
२०१३ मध्येच यूपीएने केला होता करार - मल्लिकार्जुन खरगे
बुलेट ट्रेनसाठी २०१३ मध्येच जपानशी तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने करार केला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीत लाभ व्हावा यासाठीच मोदी यांनी बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनासाठी ही वेळ निवडली. त्यांना यातून राजकीय लाभ मिळवायचा आहे.
मोदी या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कर्तृत्व स्वत:चे म्हणून सांगत आहेत. यूपीने जपानशी सात अब्ज डॉलर्सचा करार केला होता. त्यानुसार दिल्ली-मुंबई आर्थिक मार्ग केला जाणार होता व त्यातच बुलेट ट्रेनचा समावेश होता. या करारात मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेमार्गांचाही तपशील होता.