Devendra Fadanvis: भगव्या झेंड्याच्या रक्षणाची जबाबदारी आता आपली, फडणवीसांचा शिवसेनेवर वार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 05:45 PM2022-02-21T17:45:46+5:302022-02-21T17:52:12+5:30
Devendra Fadanvis: देशाला मार्गदर्शन देणाऱ्या भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आता भाजपावरती आली असून भाजपने ही जबाबदारी स्वीकारली आहे
नाशिक - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. बिगर-भाजप आघाडी करण्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर, चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सुडाचे राजकारण करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत केली. तर, नाशिक दौऱ्यात शिवसेनेला टोलाही लगावला.
देशाला मार्गदर्शन देणाऱ्या भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आता भाजपावरती आली असून भाजपने ही जबाबदारी स्वीकारली आहे. भगव्या झेंड्याचे रक्षण करून समाजाला न्याय देण्यासाठी सतत झगडत राहू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला. नाशिक येथे भाजपाच्या कार्यकर्ता मेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे बाण चालवले. आज काही जणांनी भगवा झेंड्याच्या नावाखाली वेगळे कामे सुरू केले आहे परंतु, आता या भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली आहे. कारण भगवा हा शिवछत्रपतींचा आहे, शिवछत्रपती महाराज हे महाराष्ट्राचा आदर्श आणि दैवत आहे. त्यांच्या झेंड्याचा अपमान करणाऱ्यांना आता समाजामध्ये कोणतेही स्थान उरलेले नाही, अशा शब्दात फडणवीसांनी शिवसेनेवर टिका केली.
राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण राज्य सरकार हे मुंबईबाहेर कुठेही लक्ष देण्यास तयार नाही. तीन पक्षांचे सरकार आहे, परंतु त्यांची तोंडे तीन दिशेला आहेत. आज कोणत्याही विकासात्मक कामांवर निर्णय होत नाहीत, याचा खेद वाटत आहे. राज्य सरकार हे फक्त मुंबईपुरतं मर्यादित राहिले आहे, असा टोला देखील फडणवीसांनी यावेळी लगावला.
चंद्रशेखर राव मलाही बेटले होते.
एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. त्यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर राव मलाही येऊन भेटले होते. त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. यापूर्वीही विरोधकांनी लोकसभेत आणि विविध राज्यांमध्ये हातात हात घालून आघाडीचे प्रयोग केले होते. त्यांचा प्रयोग फसला होता. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
आघाडी सरकार सुडाचे राजकारण करतेय
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. यावर बोलताना, हे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. मात्र, न्यायालय आहे. त्या संदर्भात योग्य कार्यवाही करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दररोज काय होत आहे. हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलाबाबत काय झाले. सोमय्यांचा कशा पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणांबाबत काय चालले आहे, हे सगळे जनता पाहत आहेत. सुडाचे राजकारण कोण करत आहे सर्वजण पाहत आहेत. सरकारची सुडाची भावना त्यातून पुढे येत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.