कर्नाटक सीमेवर ट्रक फोडल्यानंतर फडणवीस आक्रमक, मुख्यमंत्री बोम्मईंना फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 03:24 PM2022-12-06T15:24:22+5:302022-12-06T15:24:59+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी करुन आक्रमकपणे भूमिक मांडली.
मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा सुरू केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनीही तात्काळ या घटनेची दखल घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी करुन आक्रमकपणे भूमिक मांडली. फडणवीसांनी बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. तसेच, महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात दिले आहे.
काय आहे घटना
बेळगाव-हिरेबागवाडी येथे महाराष्ट्र पासिंगचे ट्रक लक्ष्य करण्यात आले आहेत. यात ६ ट्रकचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्याविरोधात कन्नड रक्षण वेदिकांची घोषणाबाजी सुरू असून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे ट्रक रोखून त्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी कन्नड रक्षण वेदिका आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. कन्नड रक्षण वेदिकाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हिरेबागवाडी येथे महाराष्ट्राचे ट्रक रोखून धरले आहेत. कार्यकर्ते कन्नड रक्षण वेदिकेचे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी करत आहेत. ट्रकच्या टपावर चढून आंदोलन करत आहेत. कर्नाटकच्या या आगळीकीवर महाराष्ट्रातील नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेचा अंत पाहू नका- उदय सामंत
"कर्नाटककडून महाराष्ट्रातील ट्रकवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. कर्नाटकनं महाराष्ट्रातील जनतेचा अंत पाहू नये. अशाप्रकारच्या घटना करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना करू", असं उदय सामंत म्हणाले आहेत.