देवेंद्र फडणवीसांची गृहमंत्र्यांशी चर्चा; सोमय्यांची गृहसचिवांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 07:03 AM2022-04-26T07:03:54+5:302022-04-26T07:04:15+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले
नवी दिल्ली : हनुमान चालिसा व भोंगा यावरून सुरू झालेला वाद आता राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर येऊन ठेपला आहे. याच मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी झालेल्या हल्ल्याची विशेष तपास पथकातर्फे चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय गृहसचिवांकडे केली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना निवेदन दिले आहे. यात राज्यात ‘अराजका’ची स्थिती असल्याचे नमूद केले आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर सोमय्यावरील हल्ला गंभीर बाब असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.
हल्ल्याची एसआयटीकडून चौकशी व्हावी
किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात भाजपच्या आमदारांनी केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना निवदेन दिले. यात सोमय्यांवरील हल्ल्याची विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, सीआयएफआयने या हल्ल्यासंदर्भात नव्याने गुन्हा दाखल करावा, सोमय्यांवरील हा तिसरा हल्ला असल्याने त्यांच्या सुरक्षेचा नव्याने आढावा घ्यावा, शिवसैनिक व खार पोलिसांच्या विरोधात कारवाई करावी, अशा मागण्या केल्या.