देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील महत्त्व वाढलं; शपथविधी सोहळ्यात मानाचं स्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 16:57 IST2022-07-26T16:36:58+5:302022-07-26T16:57:15+5:30
महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिले जाते. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी संख्याबळ नसतानाही भाजपाला मोठा विजय मिळवून दिला.

देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील महत्त्व वाढलं; शपथविधी सोहळ्यात मानाचं स्थान
नवी दिल्ली - राज्यातील सत्तांतरानंतर भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीतील महत्त्व वाढल्याचं दिसून आलं आहे. राष्ट्रीय राजधानीतील सेंट्रल हॉलमध्ये नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. पहिल्या आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती म्हणून मुर्मू यांनी शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींपासून समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
या शपथविधी सोहळ्याचा एक फोटो समोर आला. ज्या राज्याचे प्रमुख नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहिल्या रांगेत मानाचं स्थान देण्यात आले होते. फडणवीसांना मिळालेले हे स्थान विशेष होतं कारण देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्यात तिसऱ्या रांगेत बसावं लागलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानाचं स्थान देण्यात आले तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तिसऱ्या रांगेत बसले होते. त्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या यादीत फडणवीसांची ताकद वाढली आहे. सध्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे भाजपाचा चेहरा म्हणून उदयास आले आहेत.
महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिले जाते. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी संख्याबळ नसतानाही भाजपाला मोठा विजय मिळवून दिला. राष्ट्रीय स्तरावर, बिहार आणि गोवा विधानसभा निवडणुकीत जेथे ते पक्षाचे निरीक्षक होते. याठिकाणीही फडणवीसांनी उत्तम कामगिरी केली. राज्यात त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सातत्याने विजय मिळवत आहे.
राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी झाली. ती फार काळ टिकणार नाही आणि ती अखेर कोसळेल, असा अंदाज देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासूनच वर्तवला होता. त्यांचा अंदाज अडीच वर्षांनी खरा ठरला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार स्थापन झाले आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. या राजकीय भूकंपाचं श्रेय राजकीय निरीक्षक आणि तज्ज्ञांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आणि त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पाहिले. मात्र अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. फडणवीसांनी सरकारचा भाग न राहता बाहेरून मदत करण्याचे पसंत केले. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या, म्हणजे भाजपचे प्रमुख जे. पी. नड्डा यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.