जागावाटपाच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्रातून बडे नेते निवडणुकीच्या मैदानात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 11:30 PM2024-03-11T23:30:08+5:302024-03-11T23:32:05+5:30
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांतून दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची निश्चिती करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची राजधानी नवी दिल्ली बैठक सुरू आहे. निवडणूक समितीच्या पहिल्या बैठकीनंतर भाजपने तब्बल १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमदेवाराचा समावेश नव्हता. महाराष्ट्रात भाजप महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने जोपर्यंत जागावाटप निश्चित होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघातील उमेदवार जाहीर न करण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. मात्र आता जागावाटपाचं चित्र काहीसं स्पष्ट होऊ लागल्याने भाजपने महाराष्ट्रातील उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब करण्यास सुरुवात केली असून आजच्या बैठकीत काही जागांबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.
भाजपकडून यंदा महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांतून दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणून कॅबिनेट मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. तसंच विद्यमान मंत्री सुधी मुनगंटीवार यांनाही चंद्रपुरातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं. आजच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच पुण्यातून शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सांगलीतून पुन्हा संजयकाका पाटील, कोल्हापुरात समरजीतसिंह घाटगे आणि छत्रपती संभाजीनगरमधून पालकमंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.
महायुतीचं जागावाटप कसं होणार?
महायुतीमध्ये भाजप ३४ ते ३५ जागा लढणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार असताना त्याहीपेक्षा कमी जागा त्यांना मिळणार असल्याचे जे चित्र समोर आल्यामुळे चलबिचल आहे. मविआमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २० हून अधिक जागा मिळणार असल्याचे चित्र असताना शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत त्याहून निम्म्याही जागा मिळणार नसतील तर भाजपसोबत जाण्याचा फायदा काय, असा सवाल आता शिंदे यांचे समर्थक आमदार, खासदार करीत आहेत.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत मिळणार असलेल्या जागांपेक्षा दोन तरी अधिक जागा महायुतीत आपण घ्यायला हव्यात, असा दबाव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर वाढवला आहे. त्यामुळे याबाबत महायुतीच्या नेत्यांकडून कसा तोडगा काढला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.