फडणवीस यांच्या हाती बिहार निवडणुकीची सूत्रे; भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 06:08 AM2020-08-15T06:08:53+5:302020-08-15T06:47:38+5:30
भाजपा नेतृत्त्वाकडून फडणवीसांवर मोठी जबाबदारी
दिल्ली/ मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी पक्षातर्फे फडणवीस यांना तसे कळविण्यात आले आहे.
बिहारमध्ये चालू वर्षाअखेर निवडणूक होत आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागा असून जदयू, भाजपमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. फडणवीस यांची प्रतिमा संयमी नेता अशी आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयू हा तेथे मोठा पक्ष आहे. अशा वेळी २४३ जागांपैकी जास्तीत जास्त जागा भाजपकडे घेताना फडणवीस तसेच बिहार भाजपचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचा कस लागणार आहे.
यानिमित्ताने फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, फडणवीस यांच्या निकटस्थांनी सांगितले की, ही जबाबदारी केवळ बिहार निवडणुकीपुरतीच मर्यादित आहे. फडणवीस राष्ट्रीय राजकारणात तूर्त अजिबात जाणार नाहीत.
सुशांत प्रकरणाची किनार
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद बिहारमध्ये उमटत आहेत. मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमधील वादही यानिमित्ताने समोर आला आहे. बिहारी विरुद्ध मराठी असा रंगही दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील निवडणुकीची जबाबदारी भाजपने मराठी नेत्यावर टाकली आहे.