...तर फडणवीसांनी सगळ्यात आधी PM मोदींचा पर्दाफाश करावा; राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:59 AM2024-06-27T10:59:16+5:302024-06-27T11:01:13+5:30

खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

devendra Fadnavis should first expose PM Modi Attack of the sanjay Raut | ...तर फडणवीसांनी सगळ्यात आधी PM मोदींचा पर्दाफाश करावा; राऊतांचा हल्लाबोल

...तर फडणवीसांनी सगळ्यात आधी PM मोदींचा पर्दाफाश करावा; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut ( Marathi News ) : लोकसभेतील संख्याबळ वाढल्यानंतर विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला असून इंडिया आघाडीतील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतूनही पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. "नरेंद्र मोदी हे मागील १० वर्षांपासून लोकशाही छाताडावर उभे राहून राज्य करत होते. कोण राहुल? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसंच उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख केला होता. आता कोण असली आणि कोण नकली हे आम्ही त्यांना दाखवून देऊ," असा इशारा राऊत यांनी दिला आहे. 

विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हचा पर्दाफाश करणार, असं वक्तव्य भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावरून पलटवार करताना संजय राऊत म्हणाले की, "असं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी सर्वांत आधी नरेंद्र मोदींचा पर्दाफाश केला पाहिजे. कारण नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षांपासून खोटं नरेटिव्ह उभं करून देशातील लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला," असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदेंना दिलं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच लोकसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापेक्षा आमचा स्ट्राइक रेट अधिक असल्याचं म्हटलं होतं. त्यावर बोलताना राऊत यांनी म्हटलं की, "एकनाथ शिंदे काय म्हणतात, त्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. ते भरकटलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं मुख्यमंत्रिपद औटघटकेचं आहे. ते घटनाबाह्य, बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत आणि जे घटनाबाह्यपणे सत्तेत आलेले असतात ते राजकीयदृष्ट्या  मनोरुग्ण असतात. बहुमत गमावलेले लोक जेव्हा सत्तेत असतात तेव्हा त्यांच्याकडून अशा प्रकारची वक्तव्यं होत असतात," अशी टीका राऊत यांनी केली आहे. 
 

Web Title: devendra Fadnavis should first expose PM Modi Attack of the sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.