तामिळनाडूमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याची मोडतोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 12:17 AM2018-03-07T00:17:19+5:302018-03-07T00:22:07+5:30
त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट नेते लेलिन यांच्या प्रतिमेच्या झालेल्या मोडतोडीमुळे देशातील राजकारण तापलेले असतानाच, मंगळवारी तामिळनाडूमध्येही पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वेल्लूर - त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट नेते लेलिन यांच्या प्रतिमेच्या झालेल्या मोडतोडीमुळे देशातील राजकारण तापलेले असतानाच, मंगळवारी तामिळनाडूमध्येही पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तामिळनाडूमधील वेल्लूर येथे घडलेल्या या घटनेनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. लेलिन यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्यानंतर आता तामिळनाडूमध्ये पेरियार यांचे पुतळे पुढील लक्ष्य असल्याचे वक्तव्य भाजपा नेते एच. राजा यांनी केल्यानंतर काही तासांतच हा प्रकार घडला आहे.
पेरियार आंदोलनाचे प्रणेते पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार आज समोर आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन व्यक्तींना अटक केली आहे. प्रसारमाध्यमांमधून येत असलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक भाजपाचा आणि सीपीआयच्या एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. मोडतोडीमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्याचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत डाव्यांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी त्रिपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजयी उन्माद दिसून आला होता. या कार्यकर्त्यांनी काल दुपारी डाव्यांचा आदर्श असणारा कम्युनिस्ट नेता लेनिन याचा बेलोनिया शहराच्या मध्यवर्ती भागातील पुतळा बुलडोझरने पाडला. एवढेच नव्हे तर हा पुतळा पाडल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्याचे शीर वेगळे करून त्याला फुटबॉलसारखे लाथाडले होते. या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाला कम्युनिस्टांची प्रचंड भीती वाटत असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याची टीका मार्क्सवादी नेत्यांनी केली. तर हे कृत्य म्हणजे डाव्यांच्या दमनशाहीविरुद्ध असणारा लोकांचा रोष असल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.