काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात कोसळले भाविक; निष्काळजीपणामुळे आठ पोलिस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 03:32 PM2024-10-11T15:32:53+5:302024-10-11T15:34:27+5:30

काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शनादरम्यान महिला पडल्याप्रकरणी आठ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Devotee had fallen in Kashi Vishwanath Temple eight policemen have been suspended on charges of negligence | काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात कोसळले भाविक; निष्काळजीपणामुळे आठ पोलिस निलंबित

काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात कोसळले भाविक; निष्काळजीपणामुळे आठ पोलिस निलंबित

Kashi Vishwanath Temple : उत्तर प्रदेशातीलवाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शनादरम्यान एक महिला अर्घामध्ये पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेशी संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मंदिर प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यानंतर स्पर्श दर्शनावर बंदी घालण्यात आली होती. आता निष्काळजीपणावर कारवाई सुरू झाली आहे. याप्रकरणी गुरुवारी चार उपनिरीक्षकांसह आठ पोलिसांना निलंबित करण्यात आले. पोलीस प्रशासनाने ही माहिती दिली आहे. 

स्पर्श दर्शन म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या अर्घामधील शिवलिंगाला स्पर्श करणे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ७ ऑक्टोबर रोजी सप्तर्षी आरतीनंतर घडली. आरतीनंतर स्पर्श दर्शन करत असताना एका महिलेचा तोल गेला आणि ती आर्घामधील शिवलिंगावर पडली. महिला पडताच इतर काही भाविकही तिच्या अंगावर पडले. कसेबसे मंदिर सुरक्षा कर्मचारी आणि अर्चकांनी परिस्थिती हाताळून महिलेले बाजूला केले.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. व्हीव्हीआयपी आणि मोठ्या देणगीदारांना योग्य स्पर्ष दर्शन दिले जाते आणि सामान्य भाविकांसाठी कोणतीही व्यवस्था केली जात नाही, अशी टीका नेटकऱ्यांनी केली. मंदिर प्रशासनाने या घटनेबद्दल खेद व्यक्त करत एक निवेदन जारी करून सप्तर्षी आणि शृंगार आरती दरम्यान गर्भगृहाचा दरवाजा उघडण्यात आल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी सांगितले की, भाविकांची गर्दी अचानक वाढल्याने स्पर्श दर्शन करत असताना महिला घसरून शिवलिंगाजळ पडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, गर्भगृहात तैनात चार उपनिरीक्षक, एक पुरुष हवालदार आणि तीन महिला हवालदारांनी त्यांच्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे गर्दी जमली आणि ही घटना घडली. त्यानुसार पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

उपनिरीक्षकांबाबतचे अहवाल आपापल्या जिल्ह्यांना पाठवले आहेत. पोलिस आयुक्त मोहित अग्रवाल यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. या प्रकरणी चार उपनिरीक्षकांसह आठ पोलिसांच्या निलंबनाचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले. आयुक्तांनी दिलेल्या आदेशात दुसऱ्या जिल्ह्यातून कर्तव्यावर आलेल्या तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्याचा अहवाल संबंधित जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना पाठवण्यात आला आहे. डीसीपी सुरक्षा अमित श्रीवास्तव यांच्या तपास अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

अहवालानुसार, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ७ ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येने भाविक गर्भगृहात दाखल झाले होते. धक्काबुक्कीमुळे दोन भाविक अर्घ्यामध्ये पडले होते. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलिस निरीक्षक सुरेश चंद्र द्विवेदी, कॉन्स्टेबल भूपेश यादव, महिला कॉन्स्टेबल वंदना सरोज, प्रीती आणि सुनैना, पोलिस निरीक्षक रमाकांत राय, कॉन्स्टेबल अजित कुमार सिंह आणिकॉन्स्टेबल दुर्गेश कुमार यांच्या निलंबनाचा अहवाल पाठवण्यात आला आहे.

Web Title: Devotee had fallen in Kashi Vishwanath Temple eight policemen have been suspended on charges of negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.