भारीच! सोनं-चांदी किंवा पैशाने नव्हे तर आई-वडिलांनी लेकीची केली महागड्या टोमॅटोने तुला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 10:23 AM2023-07-19T10:23:43+5:302023-07-19T10:40:04+5:30
सर्वसामान्यांना टोमॅटो खरेदी करणे कठीण होत असताना मंदिरात देवीला टोमॅटो अर्पण करण्यात आले आहेत.
देशभरात भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत, विशेषतः टोमॅटोचे. टोमॅटोच्या वाढत्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी बाजारात टोमॅटो 150 रुपयांपेक्षा जास्त किमतीने विकला जात आहे. मात्र, आता टोमॅटोच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यातील एका मंदिरात एका भक्ताने देवीला प्रसन्न करण्यासाठी टोमॅटोने लेकीची तुला केल्याची अनोखी घटना समोर आली आहे.
हे दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण एवढ्या महागाईत सर्वसामान्यांना टोमॅटो खरेदी करणे कठीण होत असताना मंदिरात देवीला टोमॅटो अर्पण करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यातील नुकालम्मा मंदिरात ही घटना घडली आहे, जिथे देवी विराजमान आहे. देवीला प्रसन्न करण्यासाठी एका भक्ताने टोमॅटोने तुला केली.
सुमारे 51 किलो टोमॅटो मातेला अर्पण केले. असे दृश्य पाहून मंदिरात आलेले भाविक अचंबित झाले. मल्ला जग्गा आप्पाराव आणि मोहिनी यांची कन्या भविष्या हिच्यासाठी मंदिर परिसरात पूजेचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये मुलीच्या वजनाच इतके म्हणजेच 51 किलो टोमॅटो देवीला अर्पण करण्यात आले होते आणि उर्वरित गूळ आणि साखरेचा वापर करण्यात आला होता.
देशात टोमॅटोच्या किमतीत वाढ झाल्यापासून अशा अनेक घटना पहायला मिळत आहेत. टोमॅटो आणि त्याच्या वाढत्या दराबाबत सोशल मीडियावर मिम्स केले जात आहेत. टोमॅटो विकणारे काही दुकानदार टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर ठेवत असून किलो टोमॅटो खरेदी करणाऱ्यांना श्रीमंतांसारखी वागणूक दिली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.