गुजरातच्या मंदिरांमध्ये भाविकांना 'साष्टांग नमस्कार' घालण्याची परवानगी नाही, फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 11:50 AM2021-01-13T11:50:06+5:302021-01-13T11:57:13+5:30
Devotees Only Can Do Namaste In Temples In Gujrat : यज्ञाच्या वेळी तीनपेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी नाही, असे विजयसिंह चावडा म्हणाले.
अहमदाबाद : देशात कोरोनाच्या संकटामुळे बरेच काही बदलले आहे. देवाप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा मार्गही बदलला आहे. गुजरातमधीलमंदिरांमध्ये देव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी 'साष्टांग नमस्कार' घालण्याची परवानगी नाही. भाविक भक्त हात जोडून नमस्कार करू शकतात. येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या प्रमाणित कार्यप्रणालीनुसार मंदिरात नैवेद्य आणण्यास सुद्धा परवानगी दिली जात नाही.
राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर जवळपास ७५ दिवसानंतर म्हणजेच जूनमध्ये मंदिर आणि इतर धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्यात आली होती. "सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साष्टांग नमस्कार करण्यास परवानगी नाही. प्रमाणित कार्यप्रणाली अंतर्गत भाविकांनाकाहीही स्पर्श करण्याची परवानगी नाही. लोकांना केवळ दर्शनासाठी मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची परवानगी आहे," असे प्रसिद्ध सोमनाथ मंदिराचे व्यवस्थापक विजयसिंह चावडा यांनी सांगितले.
याचबरोबर, कोणत्याही भाविकाला दिवसातून तीन वेळा होणाऱ्या आरतीसाठी मंदिरात प्रवेश दिला जात नाही किंवा पाचपेक्षा अधिक भाविकांना एकावेळी बसून पूजा करण्याची परवानगी नाही. यज्ञाच्या वेळी तीनपेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी नाही, असे विजयसिंह चावडा म्हणाले.
याशिवाय, गुजरातमधील आणखी एक प्रसिद्ध मंदिर बनसकांठा जिल्ह्यातील अंबाजी माता मंदिरात देखील शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साष्टांग नमस्कार घालण्याची परवानगी नाही. मंदिराचे प्रवक्ते आशिष रावळ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, थर्मल स्क्रीनिंगनंतर सोशल डिस्टंसिंगसह भाविकांना मास्क लावून मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी आहे.