मी अंत्यविधीचं सामान विकतो, त्यामुळेच घर चालतं, पण...; ज्येष्ठानं मोदींना लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 11:30 AM2021-04-11T11:30:03+5:302021-04-11T11:30:33+5:30
देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून अंत्यविधीचं सामान विकणाऱ्या एका व्यक्तीनं मोदींना पत्र लिहिलं आहे.
देवास: गेल्या महिन्याभरापासून देशातल्या कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. गेल्या वर्षात कोरोनाची पहिला लाट आली होती. त्यावेळी दिवसभरात कधीही १ लाखापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले नव्हते. मात्र गेल्या सहा दिवसांपासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मृतांचा आकडादेखील झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. यासंदर्भात अंत्यविधीचं सामान विकणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. याआधी कधीही एकाचवेळी इतके मृत्यू पाहिले नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
सर्दी खोकला नसेल तरीही वेळीच सावध व्हा'; समोर आली कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची गंभीर लक्षणं
मध्य प्रदेशातल्या देवास जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या लीलाधर व्यास यांनी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनादेखील पत्र लिहिलं आहे. कोरोनामुळे वाढलेल्या मृत्यूच्या प्रमाणाबद्दल व्यास यांनी चिंता व्यक्त केली आहे. 'मी लीलाधार व्यास. देवासमध्ये अंत्यविधीचं सामान विकण्याचा व्यवसाय करतो. गेल्या कित्येक दिवसांपासून मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. आधी दिवसाला एक ते दोन जणांचा मृत्यू व्हायचा. पण आता दिवसाला सरासरी १२ ते १५ जणांचा मृत्यू होतोय. अंत्यविधीच्या सामानाच्या दुकानामुळे माझी उपजीविका चालते. मात्र मृत्यूचं वाढलेलं प्रमाण चिंताजनक आहे. मृतांमध्ये वृद्ध, तरुण, लहान मुलं अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे,' असं व्यास त्यांच्या पत्रात म्हणतात.
कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी काढला पळ; २ दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्येच पडून राहिला
मृतांच्या यादीत कदाचित माझंही नाव येईल
कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांच्या यादीत कदाचित माझं किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांचं नाव येईल, अशी भीती व्यास यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षीप्रमाणे देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अनेक शहरं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. कोरोना रुग्णांवरील उपचारार्थ वापरली जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा असल्यानं त्यांची चढ्या दरानं विक्री होत असल्याचं मी ऐकलं आहे. गरीब व्यक्ती हे महागडं इंजेक्शन कसं खरेदी करणार? हे इंजेक्शन विकत घेणं त्याच्यासाठी अतिशय अवघड आहे साहेब, असं व्यास यांनी पत्रात म्हटलं आहे.
माणसं मरुन पडतील तेव्हा जाग येणार का...?, काहींची बेफिकिरी आणि काहींची मजबुरी...
ज्यांनी आपली माणसं गमावली, त्यांना आयुष्याची किंमत माहित्येय
औषधं आणि इंजेक्शन महाग असल्यानं गरिबांना उपचार घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे इंजेक्शनचं उत्पादन वाढवा, त्यावरील कर कमी करा, गरिबांना मोफत उपचार द्या, औषधांचा काळाबाजार रोखा, असे सल्ले व्यास यांनी सरकारला दिले आहेत. मृतांची संख्या वाढत आहे. दररोज जळणाऱ्या चिता चिंतेचं कारण ठरत आहेत. मृत्यूचं प्रमाण किती वाढलंय याची कल्पना स्मशानात दररोज येणारे मृतदेह पाहून येऊ शकेल. ज्यांनी आपली जवळची माणसं गमावली आहेत, त्यांना आयुष्याची किंमत माहीत आहे, अशा शब्दांत व्यास यांनी काळजाला हात घातला आहे.
याआधी कधीच इतके मृत्यू पाहिले नाहीत
'मी अंत्यविधीचं सामान विकतो. माझं एक दुकान आहे. मात्र आयुष्यात कधीच इतकी भयावह परिस्थिती पाहिली नाही. मला माझी आणि माझ्या कुटुंबाची चिंता सतावत आहे. राज्यातल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या स्मशानात गेल्यावरच कमी होत आहे,' असं व्यास यांनी त्यांच्या पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.