विमानसेवेवरील निर्बंध जैसे थे; आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत डीजीसीएचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 07:50 AM2022-01-20T07:50:52+5:302022-01-20T07:51:42+5:30

भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गेल्या २१ महिन्यांपासून हे निर्बंध लागू आहेत.

DGCA extends ban on international flights till Feb 28 | विमानसेवेवरील निर्बंध जैसे थे; आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत डीजीसीएचा निर्णय

विमानसेवेवरील निर्बंध जैसे थे; आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत डीजीसीएचा निर्णय

googlenewsNext

मुंबई : भारतातून ये-जा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध २८ फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गेल्या २१ महिन्यांपासून हे निर्बंध लागू आहेत.

याबाबत ‘डीजीसीए’ने नुकताच अधिकृत निर्णय जाहीर केला. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कायम राहतील. त्यापुढील निर्णय कोरोनास्थितीनुरूप घेण्यात येईल. मात्र, मालवाहू (कार्गो) विमानांचे प्रचलन कोणत्याही बंधनांविना सुरू राहील. शिवाय, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवर नियोजित फेऱ्या मर्यादित स्वरूपात चालविण्यात येतील. त्याचा निर्णय ‘केस टू केस’ तत्त्वावर प्राधिकरणाकडून घेतला जाईल.

तथापि, वंदे भारत अभियान आणि एअर बबल कराराअंतर्गत सुरू असलेली उड्डाणे वेळापत्रकानुसार प्रचलन करतील. सरकारी मापदंडांनुसार पात्र लोक त्यामाध्यमातून भारतात ये-जा करू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताने १८ हून अधिक देशांशी एअर बबल करार केले असून, त्याअंतर्गत दोन्ही देशांतील प्रमुख विमान कंपन्यांना आठवड्यातून ठराविक दिवस पूर्वनियोजित फेरी चालविण्यास परवानगी देण्यात येते.

‘ओमायक्रॉन’चा परिणाम
भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध आणखी वाढवू नयेत असे आवाहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेद्वारे करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची तिसरी लाट आणि काही देशांत मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होऊ लागल्याने खबरदारी म्हणून डीजीसीएने हा निर्णय घेतल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. 
२३ मार्च २०२० पासून हे निर्बंध लागू आहेत. दरम्यान, १५ डिसेंबर २०२१ पासून आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या करण्याचा निर्णय १ डिसेंबरला घेण्यात आला होता. मात्र, ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर त्याबाबत फेरविचार करीत बंदी कायम ठेवण्यात आली.

Web Title: DGCA extends ban on international flights till Feb 28

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.