IndiGo एअरलाइन्सला 5 लाखांचा दंड! विमानात चढण्यापासून रोखलं होतं दिव्यांग मुलाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 04:22 PM2022-05-28T16:22:59+5:302022-05-28T16:24:11+5:30
Indigo : भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करणार असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्याबद्दल इंडिगोला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डीजीसीएने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचार्यांनी मुलाशी वाईट वागणूक दिल्याने प्रकरण वाढले, असे डीजीसीएने म्हटले आहे.
भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करणार असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. तसेच, डीजीसीएच्या म्हणण्यानुसार, "जर हे प्रकरण सहानुभूतीने हाताळले गेले असते, तर हे प्रकरण इतके वाढले नसते की प्रवाशाला बोर्डिंगसाठी मनाई केली असती." डीजीसीएने म्हटले आहे की, विशेष परिस्थितीत चांगला प्रतिसाद आवश्यक आहे. परंतु एअरलाइनचे कर्मचारी परिस्थिती हाताळू शकले नाहीत आणि नागरी उड्डाण नियमांची भावना कायम ठेवण्यास चुकले.
DGCA fines IndiGo Rs 5 lakh for denying boarding to child with special needs
— ANI Digital (@ani_digital) May 28, 2022
Read @ANI Story | https://t.co/FWcLfXQjT2#indigo#DGCApic.twitter.com/dguJIYTraM
दरम्यान, इंडिगो विमान कंपनीच्या ग्राउंड स्टाफने दिव्यांग मुलाला बोर्डिंगपासून थांबवल्याच्या वृत्ताने प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. या निर्णयावर चौफेर टीका होत होती, त्यानंतर डीजीसीएने त्याची दखल घेत चौकशी सुरू केली. रांची-हैदराबाद फ्लाइटमधील प्रवासी मनीषा गुप्ता यांनी मुलाची आणि त्याच्या पालकांना ग्राउंड स्टाफकडून त्रास होत असल्याचे सांगितले, तेव्हा ही बाब उघडकीस आली होती.
मनीषा गुप्ता यांनी एका पोस्टमध्ये सांगितले की, इंडिगोचे मॅनेजर मुलाची प्रकृती स्थिर नसल्याबद्दल सतत ओरडत होते. विमानात बसलेल्या अनेक प्रवाशांना पीडित कुटुंबाला मदत करावी असे वाटले आणि त्यांनी मॅनेजरला विमानात बसू देण्याची विनंती केली पण त्यांचे ऐकले नाही.
काय म्हणाले होते इंडिगोचे सीईओ?
ही घटना उघडकीस आल्यानंतर इंडिगो एअरलाइनचे सीईओ रॉनजॉय दत्ता म्हणाले की, बोर्डिंगच्या वेळी मुलगा घाबरला होता आणि त्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करावी लागली. तसेच, विमान कंपनीने सांगितले होते की, कुटुंबाला हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पाठवण्यात आले.