दक्षिणेकडील राज्यांत धाे-धाे, बंगळुरूत १३३ वर्षांचा विक्रम माेडला, एका दिवसात १११ मिमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 11:13 AM2024-06-04T11:13:50+5:302024-06-04T11:13:56+5:30

गेल्या २४ तासांमध्ये बंगळुरूमध्ये १११.१ मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले. 

Dha-Dha in southern states, Bangalore breaks 133-year-old record, 111 mm rainfall in one day | दक्षिणेकडील राज्यांत धाे-धाे, बंगळुरूत १३३ वर्षांचा विक्रम माेडला, एका दिवसात १११ मिमी पाऊस

दक्षिणेकडील राज्यांत धाे-धाे, बंगळुरूत १३३ वर्षांचा विक्रम माेडला, एका दिवसात १११ मिमी पाऊस

बंगळुरू : निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापलेले असतानाच प्रचंड उष्णतेमुळे नागरिकांचे हाल बेहाल झाले आहेत. आता उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळू शकताे. मान्सूनची वाटचाल वेगाने हाेत असून दक्षिणेकडील राज्यांमध्ये धाे-धाे पाऊस बरसत आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये पावसाने गेल्या १३३ वर्षांचा विक्रम माेडला आहे. गेल्या २४ तासांमध्ये बंगळुरूमध्ये १११.१ मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले. 

उत्तर भारतात पारा ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. नवतपामध्ये नागरिकांचे अक्षरशः हाल झाले. एकट्या मे महिन्यातच ४६ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. मात्र, नवतपा संपताच मान्सून केरळमध्ये दाखल झाला. दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडूमध्ये दमदार पाऊस   झाला. आता मान्सून कर्नाटकमध्ये असून लवकरच महाराष्ट्रात दाखल हाेणार आहे.

आसाममध्ये पुरामुळे ३ लोकांचा मृत्यू
आसाम राज्यातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुरामुळे आणखी तीन नवीन मृत्यू झाल्याची माहिती असून, अनेक नवीन भाग सध्या पूर्णपणे पाण्याखाली आहेत. तरीही बाधित लोकांची संख्या कमी झाल्याची माहिती, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीपत्रकात देण्यात आली आहे. 
आसाम राज्यातील १३ जिल्ह्यांमधील ५,३५,२४६ लोकांना पुराचा फटका बसला आहे. पूर आणि वादळामुळे कचर येथे दोन आणि नगाव येथे एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोपिली, बराक आणि कुशियारा या तीन प्रमुख नद्या सध्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत.

वीज कोसळून चाैघांचा मृत्यू
ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडल्याच्या घटनेत चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. चारही जण पट्टापूर येथील रहिवासी हाेते. 

मान्सूनची स्थिती काय?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून अरबी समुद्रात आणखी पुढे सरकला आहे. कर्नाटक, रायलसीमा, तटवर्ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. गाेवा आणि काेकणात मान्सून दाखल हाेण्यासाठी वातावरण अनुकूल आहे.

Web Title: Dha-Dha in southern states, Bangalore breaks 133-year-old record, 111 mm rainfall in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस