कष्टाचं फळ! वडील चालवतात ढाबा, मुलगा झाला लेफ्टनंट; १० वेळा अपयश पण मानली नाही हार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 14:19 IST2024-12-16T14:18:50+5:302024-12-16T14:19:23+5:30
लेफ्टनंट झालेला दीपक सिंह बिष्ट हा मूळचा अल्मोडा जिल्ह्यातील बागवालीपोखर रानीखेतचा रहिवासी आहे. त्याचे वडील दिल्लीत ढाबा चालवतात.

कष्टाचं फळ! वडील चालवतात ढाबा, मुलगा झाला लेफ्टनंट; १० वेळा अपयश पण मानली नाही हार
इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (IMA) येथे शनिवारी पासिंग आऊट परेड झाली. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आणि देशसेवेची तळमळ असलेल्या अनेक तरुणांची स्वप्नं साकार होताना दिसली. त्यापैकी एक म्हणजे उत्तराखंडचा रानीखेतमध्ये राहणारा दीपक सिंह बिष्ट. १२ व्या प्रयत्नात सीडीएस उत्तीर्ण होऊन तो आर्मी ऑफिसर झाला.
लेफ्टनंट झालेला दीपक सिंह बिष्ट हा मूळचा अल्मोडा जिल्ह्यातील बागवालीपोखर रानीखेतचा रहिवासी आहे. त्याचे वडील दिल्लीत ढाबा चालवतात. त्याने सुरुवातीचं शिक्षण घराजवळील महातगाव येथील प्रिन्स पब्लिक स्कूलमधून झालं. यानंतर तो आपल्या आई-वडिलांसोबत दिल्लीला आला आणि सूरजमल विहार येथील सरकारी टॅलेंट डेव्हलपमेंट स्कूलमधून इंटरमिजिएट पास झाला.
दीपक सिंह बिष्ट याने इंटरमिजिएटच्या शिक्षणादरम्यान एनसीसीमध्ये प्रवेश घेतला होता. इथूनच आर्मी ऑफिसर बनण्याची स्वप्नं पाहू लागला. तो सीडीएसमध्ये १० वेळा नापास झाला. त्याचं ११ व्यांदा हवाई दलात निवड झाली. पण सैन्यात भरती होण्याचं त्याचं ध्येय होतं. त्यामुळे तो पुन्हा एकदा सीडीएसमध्ये रुजू झाला. सरतेशेवटी त्याची बाराव्यांदा सैन्यात निवड झाली.
पासिंग आऊट परेडनंतर जेव्हा दीपक सिंह बिष्ट त्याची आई गीता देवी बिष्ट आणि वडील राजेंद्र सिंह बिष्ट यांना भेटला. तेव्हा आपल्या मुलाला गणवेशात पाहून दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले होते. आपल्या मुलाने खूप कष्ट केल्याचं वडिलांनी सांगितलं. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.