अयोध्येत भव्य राम मंदिर तर बनतंय, पण मशिदीच्या कामाचं काय झालं? समोर आली महत्वाची माहिती, वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 03:16 PM2023-03-08T15:16:54+5:302023-03-08T15:17:43+5:30

रामनगरी अयोध्येत भव्य राम मंदिराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. तर दुसरीकडे मशिदीच्या उभारणीचं काम रमजानच्या पवित्र महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

dhannipur mosque construction work will start after ramadan month | अयोध्येत भव्य राम मंदिर तर बनतंय, पण मशिदीच्या कामाचं काय झालं? समोर आली महत्वाची माहिती, वाचा...

अयोध्येत भव्य राम मंदिर तर बनतंय, पण मशिदीच्या कामाचं काय झालं? समोर आली महत्वाची माहिती, वाचा...

googlenewsNext

अयोध्या-

रामनगरी अयोध्येत भव्य राम मंदिराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. तर दुसरीकडे मशिदीच्या उभारणीचं काम रमजानच्या पवित्र महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. अयोध्या विकास प्राधिकरणानं (ADA) नुकत्याच झालेल्या बोर्ड बैठकीत धन्नीपुर गावात मशिदीच्या कामाच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. 

डीएम आणि एडीएचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार काही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मशिदीचा मंजूर लेआउट पुढील काही दिवसांत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडे (SCWB) सुपूर्द केला जाईल. 

एससीडब्ल्यूबीने याबाबत रमजाननंतर बैठक बोलावणार असल्याचे म्हटले आहे. इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन (IICF) नावाचा ट्रस्ट SCWB ने धन्नीपूर येथील बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन केला आहे. त्याचे सचिव अथर हुसेन म्हणाले की, "आम्ही रमजाननंतर एक बैठक बोलवू जिथे आम्ही बांधकाम सुरू करण्याच्या योजनेला अंतिम रूप देऊ" याच बैठकीत मशीद संकुलाचे बांधकाम सुरू करण्याची अंतिम तारीखही निश्चित करणार आहोत. रमजानचा पवित्र महिना २२ मार्चपासून सुरू होऊन २१ एप्रिलला संपण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये सुप्रीम कोर्टानं दिला होता निकाल
सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अयोध्येत १६व्या शतकातील बाबरी मशीद ज्या ठिकाणी उभी होती आणि कारसेवकांनी ती पाडली त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यास परवानगी दिली. कोर्टाने याच निकालात सरकारला बाबरी मशिदीच्या जागी मशीद बांधण्यासाठी अयोध्येत पाच एकरांचा मुख्य आणि योग्य भूखंड देण्यास सांगितले होते.

मशिदीला मौलवी फैजाबादी यांचे नाव देण्यात येणार
SCWB ने म्हटले आहे की ते नव्याने बांधलेल्या मशिदीला ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडलेल्या वादग्रस्त १६व्या शतकातील मशिदीशी जोडू इच्छित नाहीत. त्यामुळे मशिदीला कोणत्याही मुघल बादशाहाचे नाव दिले जाणार नाही. अतहर हुसेन म्हणाले की, मशीद आणि संकुलाला स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारी मौलवी अहमदउल्ला शाह फैजाबादी यांचे नाव देण्यात येईल. त्यात मशीद, हॉस्पिटल, कम्युनिटी किचन आणि म्युझियमचा समावेश असेल.

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालयही बांधणार
हॉस्पिटलला जास्तीत जास्त जागा दिली जाईल. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय विकसित करण्याची आमची योजना आहे. संपूर्ण रुग्णालय दोन टप्प्यात उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी १०० खाटांची भर पडणार आहे. कॅन्सर केअर, ट्रान्सप्लांट, स्पाइन, कार्डियाक, रोबोटिक्स, ऑर्थोपेडिक्स, इमर्जन्सी आणि इतर अनेक बाबतीत हे हॉस्पिटल सर्वोत्तम उपचार देईल.

सल्लागार क्युरेटर म्हणून पुष्पेश पंत यांची नियुक्ती
ट्रस्टच्या वतीने मशिदीची रचना करण्यासाठी प्राध्यापक एसएम अख्तर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ट्रस्टने प्रसिद्ध इतिहासकार, आंतरराष्ट्रीय संबंध तज्ञ आणि भारतीय पाककृतीचे इतिहासकार प्रोफेसर पुष्पेश पंत यांची मशिदी संकुलाचा एक भाग असलेल्या अभिलेख संग्रहालयाचे सल्लागार क्युरेटर म्हणून नियुक्ती केली आहे.

२ हजार लोक एकत्र नमाज अदा करू शकतील
मशीद गोलाकार आकाराची असेल आणि एका वेळी २,००० जणांना सामावून घेण्याची क्षमता असेल. बाबरी मशिदीपेक्षा ती चौपट मोठी असेल. रुग्णालयाचे संकुल मशिदीच्या सहापट आकाराचे असेल. मशीद ३,५०० चौरस मीटर जागेवर बांधली जाईल तर रुग्णालय आणि इतर सुविधा २४,१५० चौरस मीटर क्षेत्रफळावर असतील. मशिदीतील विजेच्या सर्व मागण्या सोलर पॅनेलच्या मदतीने पूर्ण केल्या जातील आणि वीज कनेक्शन नसेल. प्रकल्पासाठी निधी गोळा करण्यासाठी अद्याप कोणतीही तपशीलवार योजना नाही. बांधकामासाठी निधी गोळा करण्यासाठी दोन स्वतंत्र बँक खाती तयार करण्यात आली आहेत - एक मशिदीसाठी आणि दुसरे इतर संरचनांसाठी.

Web Title: dhannipur mosque construction work will start after ramadan month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.