हृदयस्पर्शी! मुलगा गेल्यावर सासू-सासऱ्यांनी लावलं सुनेचं दुसरं लग्न; केलं कन्यादान, बंगला दिला भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:34 AM2022-05-13T11:34:24+5:302022-05-13T11:35:35+5:30
युग प्रकाश तिवारी यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या विधवा सुनेचं लग्न लावून दिलं. तसेच तिचे कन्यादान केले.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या धारमध्ये एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. सासू-सासऱ्यांनी आई-वडील होऊन सुनेचे कन्यादान केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मुलाचा कोरोना काळात मृत्यू झाला होता. त्यानंतर घरात विधवा सून आणि तिची मुलगी होती. यावेळी सासू-सासऱ्यांनी सूनेचा एकटेपणा आणि तिचे दु:ख समजून घेतले. आयुष्याचा प्रवास एकट्याने होऊ शकत नाही म्हणून तिच्यासाठी जीवनसाथी शोधण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिचं लग्न लावून देत आशीर्वाद दिले.
धार येथील युग प्रकाश तिवारी यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या विधवा सुनेचं लग्न लावून दिलं. तसेच तिचे कन्यादान केले. एवढच नव्हे तर तिला राहण्यासाठी एक बंगला देखील भेट दिला. युग प्रकाश तिवारी आणि त्यांची पत्नी रागिनी तिवारी यांचे आयुष्य आनंदात सुरू होते. घरात दोन मुलं, सून, नात होते. मात्र, कोरोनाकाळात त्यांच्या आनंदाला ग्रहण लागल. त्यांचा लहान मुलगा प्रियंक तिवारी याचा मृत्यू झाला. त्यानंतर घरात विधवा सून ऋचा आणि नात होती. मुलाच्या मृत्यूनंतर त्याचं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं.
प्रियंक हा सॉफ्टवेअर इंजीनिअर होता. तो भोपाळ येथे मंडी दीपमध्ये एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याचे वय फक्त 34 वर्ष होते. मात्र, कोरोनाकाळात त्याचा मृत्यू झाला. यानंतर तिवारी कुटुंबावर तर आभाळ कोसळलं. यातून ते कसेबसे सावरले. मात्र, पुढे प्रश्न होता तो विधवा सून आणि नातीचा. त्यांनी सुनेचं लग्न लावून तिने नवीन आयुष्य सुरू करावं, असा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी तिच्यासाठी एक नागपूर येथील वरुण मिश्रा याच्या रुपात एक चांगले स्थळ शोधले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ऋचा हिचे लग्न आणि कन्यादान करुन तिची पाठवणी केली. प्रियंकने घर खरेदी केले होते. तिवारी परिवाराने ते घर ऋचाला लग्नात भेट म्हणून देऊन दिलं.
युग प्रकाश तिवारी आणि त्यांची पत्नी रागिनी या दोघांसाठी आपल्या विधवा सुनेचं लग्न पुन्हा लावून देणं सोपं नव्हतं. आधी त्यांनी आपल्या मुलाला गमावलं आणि नंतर सुनेलासुद्धा आपल्यापासून वेगळे करणं सोपं नव्हतं. रागिनी तिवारी म्हणाल्या की, ऋचा खूप चांगली आहे. आम्ही तिला मुलगी मानले आहे. मुलगी मानले म्हणूनच तिचा आणि नातीच्या भविष्याचा विचार करत तिचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांनी समाजालाही आवाहन केले आहे की, आपल्या सुनेला मुलीसारखे प्रेम द्यावे. हुंड्यासाठी तिचा छळ करू नका. प्रियंकचा मोठा भाऊ मयंक तिवारी यांनी आपल्या छोट्या भावाच्या आठवणीत पुस्तकाच्या रुपात साठवल्या आहेत. त्यांनी प्रियंकच्या आयुष्यावर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे नाव जीवन का मानचित्र असं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.