कोण आहेत धर्मशीला गुप्ता? ज्यांना भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 02:08 PM2024-02-12T14:08:00+5:302024-02-12T14:08:57+5:30
Dharamsheela Gupta : धर्मशीला गुप्ता या दरभंगा विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्या आहेत.
बिहारमधील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. माजी आमदार भीमसिंह आणि धर्मशीला गुप्ता यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. भीमसिंह हे नितीश सरकारमध्ये मंत्री राहिले होते, तर धर्मशीला गुप्ता या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत.
धर्मशीला गुप्ता या दरभंगा विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्या आहेत. राज्यसभेची उमेदवारी धर्मशीला गुप्ता यांना दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, धर्मशीला गुप्ता यांनी जिल्हा आणि बिहार राज्यातील संघटनेत अनेक पदे भूषवून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
धर्मशीला गुप्ता या डॉ. नागेंद्र झा महिला विद्यालयात शिक्षिका आहेत. कार्यकर्ता म्हणून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 2022 मध्ये दरभंगा महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी धर्मशीला गुप्ता यांनी निवडणूक लढवली, मात्र त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. राजकीय व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळेच त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांचा हळूहळू संघटनेत दबदबा निर्माण झाला.
सुरुवातीला त्यांना दरभंगा जिल्हा भाजपा महिला सेलच्या जिल्हाध्यक्ष बनवण्यात आले. सध्या त्या कोल इंडियाच्या सदस्याही आहेत. धर्मशीला गुप्ता यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल आनंद व्यक्त करताना भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले की, पक्षाने पुन्हा एकदा एका सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. हे फक्त भाजपामध्येच शक्य आहे, पक्ष नेहमीच सामान्य कार्यकर्त्याचा आदर करतो, असे लोकांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, धर्मशीला गुप्ता यांना राज्यसभेचे उमेदवार करून भाजपाने एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. पक्षाच्या या दाव्याने संपूर्ण मिथिलाच्या महिला मतदारांना आपल्या बाजूने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मिथिलांचलच्या सर्व वैश्य मतदारांना खूश केले आहे. याद्वारे भाजपाला आपल्या कार्यकर्त्यांना संदेश द्यायचा आहे की, पक्ष सामान्य कार्यकर्त्यालाही राज्यसभेवर पाठवू शकतो.