धारावीत शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

By admin | Published: September 26, 2014 02:24 AM2014-09-26T02:24:55+5:302014-09-26T02:24:55+5:30

धारावी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे

Dharavi Shivsena ghatabai Chawatta | धारावीत शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

धारावीत शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

Next

तेजस वाघमारे, मुंबई
धारावी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेकडून माजी आमदार बाबूराव माने यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळताच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांकडे आपली नाराजी व्यक्त करत मातोश्रीवर धाव घेतली. परंतू गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांना पुन्हा शुक्रवारी मातोश्रीवर बोलविण्यात आले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आंदोलन उभारणारे माजी आमदार बाबूराव माने यांना धारावी मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी माने यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक असताना मातोश्रीवरुन माने यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळताच पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माने यांच्याऐवजी इतर इच्छुकांना संधी देण्यात यावी, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. याविषयी नाराज पदाधिकाऱ्यांनी विभागप्रमुख सदा सरवणकर यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सरवणकर यांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत शिवाजी पार्क परिसरात नाराज पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यानंतरही नाराजांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. गुरुवारी ठाकरे तुळजाभवानी येथे असल्याने चर्चा होऊ शकली नाही. नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांना शुक्रवारी मातोश्रीवर बोलविण्यात आले आहे.
शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र सुर्यवंशी हे धारावीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. परंतू माने यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळताच त्यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. माने यांच्या उमेदवारीवरुन काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असली तरी अद्याप कोणी राजीनामा दिला नसल्याचे, सुर्यवंशी यांनी सांगितले. याबाबत शुक्रवारी मातोश्रीवर बैठक होणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.
धारावीतील नाराज पदाधिकाऱ्यांची बुधवारी रात्री उशिरापर्यंत मनधरणी करण्यात आली. काही जण नाराज असले तरी त्यांची मनधरणी करु, असे विभागप्रमुख सदा सरवणकर यांनी सांगितले.

Web Title: Dharavi Shivsena ghatabai Chawatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.