21 फेब्रुवारीपासून राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात, शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत संतांकडून प्रस्ताव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 07:07 PM2019-01-30T19:07:00+5:302019-01-30T19:40:32+5:30
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यादरम्यान आज झालेल्या शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत साधूसंतांकडून राम मंदिराबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
प्रयागराज - प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यादरम्यान आज झालेल्या शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत साधूसंतांकडून राम मंदिराबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनुसार शंकराचार्यांसह साधूसंत हे 21 फेब्रुवारी रोजी अयोध्येकडे कूच करणार असून, त्यावेळी अयोध्येत राम मंदिरासाठी न्यासपूजन करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे ऐन तोंडावर राम मंदिरावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात परमधर्म संसदेकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ''राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी 21 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. अगदी प्राणिमात्रांनाही तात्काळ न्याय देणारे रामाच्या देशात राम जन्मभूमीच्या खटल्याला न्याय देऊ शकत नाहीत,'' अशा शब्दात या पत्रकातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांची वेळ येईल तेव्हा ते आपली भूमिका निभावतील. मोदींनी दिलेले वचन पाळले नाही. आता त्यांनी साम जन्मभूमी विवादाच्या न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये अविवादित जमीन त्याच्या मालकांना परत करण्याची विनंती करण्यात आली आहे. यापैकी 48 एकर जमीन ही रामजन्मभूमी न्यासाची आहे, खरंतर एक एकर जमिनीव्यक्तिरिक्त सर्व जमीन उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीची आहे. ती जमीन रामायण पार्कसाठी अधिग्रहित करण्यात आलेली आहे.