काश्मीर खोऱ्यात धरपकड मोहीम
By Admin | Published: August 5, 2016 04:25 AM2016-08-05T04:25:02+5:302016-08-05T04:25:02+5:30
काश्मीर खोऱ्यातील निदर्शने बंद करण्यासाठी पोलिसांनी समाजकंटक आणि उपद्रवी लोकांची धरपकड सुरू केली
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील निदर्शने बंद करण्यासाठी पोलिसांनी समाजकंटक आणि उपद्रवी लोकांची धरपकड सुरू केली असून, खोऱ्यात आतापर्यंत ५०० जणांना गजाआड करण्यात आले आहे. पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, उपद्रव माजविणाऱ्या ३४९ तरुणांना गजाआड करण्यात आले असून प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे १२२ जणांनाही कोठडीत डांबण्यात आले आहे.
रस्त्यावरील निदर्शनांत आतापर्यंत दोन पोलीसांसह ५० जण मृत्युमुखी पडले असून ६००० लोक जखमी झाले आहेत. आठ जुलै रोजी सुरक्षा दलाने चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हान वनी व त्याच्या दोन साथीदारांना ठार केले होते. त्यानंतर खोऱ्यात निदर्शनांचे सत्र सुरू झाले. परिस्थिती सुधारावी यासाठी प्रारंभी अधिकाऱ्यांनी संपूर्ण खोऱ्यात संचारबंदी लागू केली होती. मात्र, ही व्युहरचना यशस्वी ठरली नाही आणि आधीपेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरले. (वृत्तसंस्था)
>जनजीवन विस्कळीतच
काश्मीर खोऱ्यात संचारबंदी आणि बंदमुळे सलग २७ व्या दिवशीही तणावासह जनजीवन ठप्प होते. निदर्शने थांबायचे नाव घेत नसल्यामुळे खोऱ्यातील बहुतांश प्रमुख शहरांत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.