Dhirendra Shastri : साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी अखेर मागितली माफी, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 08:49 PM2023-04-05T20:49:22+5:302023-04-05T20:57:13+5:30
Dhirendra Shastri : धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे. बागेश्वर धामच्या ट्विटर अकाउंटवर बाबांनी याबाबत ट्विट केलं आहे.
बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यानंतर बागेश्वर बागेश्वर बाबा यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा यांनाच देव मानण्यास नकार दिला. साई बाबा यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. यानंतर आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे. बागेश्वर धामच्या ट्विटर अकाउंटवर बाबांनी याबाबत ट्विट केलं आहे.
"संत आणि महापुरुषांबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. आपल्या मागे छत्री ठेवून आपण शंकराचार्य आहोत असे म्हटले तर कसे होईल? आमच्या शंकराचार्यांनी जे म्हटलं त्याच गोष्टीचा आम्ही पुनरुच्चार केला की साईबाबा संत, फकीर असू शकतात. त्यांच्याप्रती लोकांची आस्था आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. कोणी संत गुरुंना देव मानत असेल तर ती त्याची वैयक्तिक आस्था आणि भावना आहे. आमचा त्याला अजिबात विरोध नाही. आमच्या कोणत्या शब्दाने कुणाचं मन दुखावलं असेल तर त्याचे आम्हाला मनापासून दुःख होत असून खेद वाटत आहे" असं बागेश्वर बाबा यांनी म्हटलं आहे.
मेरा हमेशा संतों के प्रति महापुरुषों के प्रति सम्मान है और रहेगा मैंने कोई एक कहावत बोली जो हम अपने संदर्भ में बोल रहे थे कि अगर हम छतरी पीछे लगाकर कहें कि हम शंकराचार्य हैं तो ये कैसे हो सकता है…हमारे शंकराचार्य ने जो कहा वो हमने दोहराया कि साईं बाबा संत फ़क़ीर हो सकते हैं और… pic.twitter.com/aHWnC0Leal
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) April 5, 2023
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांवर केलेल्या विधानाप्रकरणी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांत लेखी तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेने केली.
बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात ही तक्रार दिली. बागेश्वर बाबांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा हे शिर्डी साईबाबांच्या भक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचे युवासेनेने तक्रारीत म्हटले आहे.
युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तत्पूर्वी, साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठे स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचे स्थान दिलेले नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही, असे विधान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले होते.
दरम्यान, ज्यांची साईबाबांवर श्रद्धा आहे, त्यांच्या श्रद्धेला मी दुखावू इच्छित नाही. कोणतेही संत असू द्या, मग गोस्वामी तुलसीदास असो, सूरदास असो हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत. काही युगपुरुष आहेत. काही कल्प पुरुष आहेत. परंतु यात कोणीही देव नाही, असेही बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"