धोतर प्रकरणावरून क्लबला फटकारले
By admin | Published: July 17, 2014 12:39 AM2014-07-17T00:39:04+5:302014-07-17T00:39:04+5:30
११ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. डी. हरिपरंतामन यांना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन क्लबमध्ये ते धोतर घालून आले या कारणासाठी प्रवेश नाकारला होता
चेन्नई : तामिळनाडूतील परंपरागत वेशभूषा म्हणून प्रचलित असलेले धोतर घालून गेलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन क्लबने प्रवेश नाकारल्याप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता यांनी संबंधित क्लबला फटकारले असून याबाबत लवकरच एक नवा कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. खासगी क्लबचे हे कृत्य तामिळ संस्कृतीचा अपमान असल्याचे सांगून, या क्लबचे परवाने रद्द करण्यासह कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
अशा तऱ्हेच्या घटनांना रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या सत्रात एक कायदा लागू करण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या निर्णयाचे काँग्रेस व भाजपाने स्वागत केले आहे.
११ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. डी. हरिपरंतामन यांना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन क्लबमध्ये ते धोतर घालून आले या कारणासाठी प्रवेश नाकारला होता. या घटनेचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटून निदर्शने करण्यात आली होती. विधानसभेत या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, या घटनेचे संबंधित क्लबकडे स्पष्टीकरण मागितले असल्याची माहिती दिली. (वृत्तसंस्था)