धोतर सोडायला येते
By admin | Published: May 20, 2015 02:35 AM2015-05-20T02:35:49+5:302015-05-20T02:35:49+5:30
एका रशियन नेत्याच्या पत्नीला माझ्या धोतराबद्दल औत्सुक्य होते. मी तुम्हाला धोतर कसे परिधान करायचे ते शिकवू शकणार नाही; मात्र धोतर कसे सोडायचे हे शिकवू शकतो,
बाबूलाल गौर : काँग्रेसकडून माफीची मागणी
भोपाळ : एका रशियन नेत्याच्या पत्नीला माझ्या धोतराबद्दल औत्सुक्य होते. मी तुम्हाला धोतर कसे परिधान करायचे ते शिकवू शकणार नाही; मात्र धोतर कसे सोडायचे हे शिकवू शकतो, पण तेही आत्ताच नाही, नंतर, असे मी सांगितले होते, असा किस्सा सांगत मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी नवा वाद उभा केला आहे. गौर यांनी जाहीररीत्या अश्लिल विधान केले असून त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
८५ वर्षीय गौर यांनी याआधीही लैंगिकतेबद्दल विधाने करीत वाद ओढवून घेतला आहे. भाजपच्या अधिवेशनात त्यांनी धोतरासंबंधी विधान केले. पोलिसांपर्यंत प्रकरण गेले तरच तो बलात्कार मानला जातो. बलात्कार हा सामाजिक गुन्हा असून तो महिला आणि पुरुषावर निर्भर असतो, कधी ते योग्य तर कधी चुकीचे असते. तक्रार केली जात नसेल तर काहीही होत नाही, असे विधान गौर यांनी यापूर्वी केले होते. (वृत्तसंस्था)
तो किस्सा रशिया भेटीचा...
गौर यांनी भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात कार्यकर्त्यांचे लक्ष स्वत:कडे खिळवून ठेवण्याच्या प्रयत्नात तरुणपणच्या रशिया भेटीचा किस्सा सांगितला. रशियाच्या स्थानिक नेत्याच्या पत्नीने मला माझे धोतर पट्ट्याविना एकाच जागी कसे राहते, याबाबत कुतूहलाने प्रश्न विचारला होता. त्यानंतर मी तिला धोतर कसे सोडायचे ते मला माहीत आहे, पण खासगीत असे म्हणालो होतो, असे त्यांनी सांगताच सभागृहात एकच हंशा पिकला. गौर हे शिवराजसिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री आहेत. ते यापूर्वी मुख्यमंत्रीही राहिले आहेत.
रशियन महिलेने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले तेव्हा मी अन्य एका महिलेला रोखले. मी तिला रोखले नसते तर भाजपने मला तिकीटच दिले नसते असे गौर गमतीने म्हणाले. रशियन महिला सुदृढ असतात. रशियन महिला माझ्या कपाळाचे चुंबन घेत असल्याचे छायाचित्र उपलब्ध करवून देण्यात आले असते तर भाजपने मला पहिल्याच प्रयत्नात तिकीट दिले नसते, असे ते विनोदाने म्हणाले.