ध्यानचंद हे देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण
By admin | Published: August 29, 2016 01:54 AM2016-08-29T01:54:43+5:302016-08-29T01:54:43+5:30
हॉकीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले ध्यानचंद हे देशभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली.
नवी दिल्ली : हॉकीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले ध्यानचंद हे देशभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली.
ध्यानचंद यांची आठवण काढताना मोदी म्हणाले की, ‘१९२८, १९३२ आणि १९३६ ला भारताला आॅलिम्पिकमध्ये हॉकीचे सुवर्ण मिळवून देण्यात ध्यानचंद यांनी निर्णायक योगदान दिले आहे.’
मोदी म्हणाले, ‘ध्यानचंद खरे देशभक्त होते. एकदा कोलकाता येथे एका सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूने ध्यानचंद यांच्या डोक्यावर स्टीक मारली. त्यावेळी सामना संपण्यास केवळ दहा मिनिटे शिल्लक होती आणि ध्यानचंद यांनी त्या वेळेत तीन शानदार गोल केले. यानंतर त्यांनी, मी दुखापतीचा वचपा गोलने काढला, असे सांगितले होते.’
दरम्यान, यावेळी रिओ आॅलिम्पिकबाबत बोलताना मोदी यांनी महिला खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले, ‘आॅलिम्पिक पदक जिंकून मुलींनी देशाचे नाव उंचावले आहे. रिओमध्ये आपली कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही यात नक्कीच तथ्य आहे. कित्येकदा असे झाले की, आपल्या अव्वल खेळाडूंना लौकिकानुसार कामगिरी करण्यात यश आले नाही. मात्र, त्याचवेळी अनेक खेळाडूंनी पहिल्याच प्रयत्नात चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे,’ असेही मोदी यांनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)