आपत्कालीन स्थितीत आता डायल करा 112 नंबर
By Admin | Published: May 8, 2016 06:55 PM2016-05-08T18:55:50+5:302016-05-08T18:55:50+5:30
केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारतात 112 नंबरला आपत्कालीन नंबर होण्यासाठी मान्यता दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8- केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारतात 112 नंबरला आपत्कालीन नंबर होण्यासाठी मान्यता दिली आहे. 1 जानेवारी 2018पासून ही 112 नंबरची सेवा सुरू होणार असून, या सेवेअंतर्गत लोकांना पोलिसांकडून तात्काळ मदत मिळणार आहे.
अमेरिकेच्या 911च्या आपत्कालीन नंबरच्या धर्तीवर 112 हा नंबर निवडण्याचा केंद्रीय दूरसंपर्क मंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. सिम कार्ड बंद झालेले अथवा आऊटगोइंग कॉलची सेवा खंडित झालेले ग्राहकही आपत्कालीन स्थितीत या नंबरवर फोन करू शकतात, अशी माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. प्रत्येक विभागासाठी वेगवेगळे विशेष नंबर देण्यात आले आहेत. पोलिसांसाठी 100 नंबर, फायर ब्रिगेडसाठी 101 नंबर, अँब्युलन्ससाठी 102 नंबर, आपत्कालीन स्थितीत 108 नंबर देण्यात आले आहेत. मात्र आता 112 नंबरवर यापैकी कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार आहे. कायद्यानुसार प्रत्येक मोबाईलमध्ये पॅनिक बटन नावानं ही यंत्रणा जोडण्यात येणार आहे.
पॅनिक बटनद्वारे ग्राहकाला 112 नंबरवर आपत्कालीन कॉल करता येणार आहे. हा एक नंबर डायल केल्यास इतरही महत्त्वाच्या नंबरवर याची माहिती पोहोचणार आहे, अशी सुविधा देण्यात आली आहे. या पॅनिक बटनमध्ये जीपीएस यंत्रणाही बसवण्याची मोबाईल कंपन्यांना सक्ती करण्यात आली आहे.