हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या
By देवेश फडके | Published: January 16, 2021 01:29 PM2021-01-16T13:29:28+5:302021-01-16T13:32:53+5:30
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, एका हिरे व्यापाऱ्याने ११ कोटी रुपयांचे दान केले आहेत.
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी या मोहिमेला प्रतिसाद देत देणग्या दिल्या. यानंतर गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने राम मंदिर उभारणीसाठी तब्बल ११ कोटी रुपयांचे दान केल्याची माहिती मिळाली आहे.
राम मंदिर उभारणीसाठी ११ कोटी रुपयांचे दान देणाऱ्या हिरे व्यापाऱ्याचे नाव गोविंदभाई ढोलकिया असे आहे. गुजरातमधील सूरत येथे असलेल्या रामकृष्ण डायमंड या कंपनीचे ते मालक आहेत. याशिवाय सूरतमधीलच व्यापारी महेश कबुतरवाला यांनी ५ कोटी, लवजी बादशाह यांनी एक कोटी रुपये राम मंदिरासाठी दान केले आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील रहिवासी असलेल्या सुरेंद्र सिंह यांनी राम मंदिर उभारणीसाठी एक कोटी, ११ लाख, ११ हजार १११ रुपयांच्या देणगीचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केला, अशी माहिती मिळाली आहे.
अगदी सामान्य माणसांपासून, व्यापारी, उद्योजकांपर्यंत सर्वजण या मोहिमेत सहभागी होत राम मंदिरासाठी देणग्या देत आहेत. देशभरात ही मोहीम राबवली जाणार असून, यातून जमा झालेली रक्कम केवळ राम मंदिराच्या निर्माणासाठी वापरली जाणार आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देणगी गोळा करण्याची देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली. ही मोहीम २७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, १३ कोटी देशवासीयांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
राम मंदिर उभारणीसाठी रामनाथ कोविंद यांनी आपल्यातर्फे आणि आपल्या कुटुंबीयाच्या वतीने पाच लाख, १०० रुपयांची देणगी दिली. तर, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांनी पाच लाख, ११ हजार रुपयांची देणगी दिली. यासह अनेक राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनीही देणग्या दिल्याची माहिती मिळाली आहे.