कोळशाच्या खाणीत सापडला २ किलोचा हिरा; इंजिनिअरचे डोळे फिरले, मनाचा तोल ढळला अन् झाला भुर्ररर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 09:43 AM2023-02-24T09:43:18+5:302023-02-24T09:43:18+5:30
उत्तर प्रदेशातील झांशी येथे पारीछा थर्मल पावर प्लांटमध्ये (पीटीपीपी) कोळशाच्या खाणीत २ किलोग्रॅम वजनाचा हिऱ्यासारखा चमकदार दगड मिळाला.
झाशी-
उत्तर प्रदेशातील झांशी येथे पारीछा थर्मल पावर प्लांटमध्ये (पीटीपीपी) कोळशाच्या खाणीत २ किलोग्रॅम वजनाचा हिऱ्यासारखा चमकदार दगड मिळाला. तो पाहताच कर्मचाऱ्यांचे डोळे फिरले आणि उपस्थित कर्मचारी आपापसांत भिडले. गदारोळ वाढल्यावर कंपनीशी संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांनी तपासाच्या नावाखाली तो हिरा सदृश्य दगड ताब्यात घेतला. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांचंही मन बदललं आणि इंजिनिअरच हिरा सदृश दगड घेऊन फरार झाले. झांशीपासून सुमारे २५ किमी अंतरावर बेतवा नदीच्या काठावर स्थित हा प्लांट उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पदन निगम या राज्य उपक्रमाच्या मालकीचा आहे.
प्लांटचे मुख्य महाव्यवस्थापक मनोज सचान म्हणाले की, भारत सरकारची आउटसोर्स कंपनी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) चे कर्मचारी प्लांटमध्ये पाठवल्या जाणाऱ्या कोळशाची गुणवत्ता तपासण्यात गुंतले होते. सोमवारी, मजुरांना झारखंडमधून नुकत्याच आलेल्या कोळसा रेकच्या वॅगनमधून २ किलो वजनाचा काचेसारखा चमकदार दगड सापडला. यानंतर कामगारांनी तो तोडला आणि तुकडे घेऊन पळ काढला. या वादादरम्यान कोणीतरी व्हिडिओ बनवून घटनास्थळी प्रभारींना माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी अधिकारी पोहोचले आणि कोणताही वाद होऊ नये म्हणून उरलेला तुकडा आपल्या घरी नेला.
दुसरीकडे, संध्याकाळी थर्मल प्लांटचे कार्यकारी अभियंता भूपेंद्र सिंग, क्यूसीआयमध्ये काम करणारे अमित सिंग यांच्यासह साइट प्रभारी यांच्या घरी पोहोचले. यानंतर तपासाच्या नावाखाली त्यांच्याकडून दगड घेण्यात आला. नंतर ते सर्वजण पळून गेले. गुरुवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपींविरुद्ध झाशीच्या बारागाव पोलिस ठाण्यात आयपीसी कलम ३७९ (चोरी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बडेगाव पोलिस ठाण्याचे अध्यक्ष विनय दिवाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
प्लांटचे मुख्य महाव्यवस्थापक मनोज सचान यांच्या म्हणण्यानुसार प्राथमिक तपासात हा खडक हिरा असावा अशी कोणतीही शक्यता नाही. तो दोन कॅरेटचा आणि नाजूक आहे, जो हिऱ्याच्या दर्जाचा नाही. एक हिरा खूप कठीण असतो आणि दहा कॅरेटपासून सुरू होतो. तो खडकासारखे दिसतो. तथापि, आम्ही त्याची पुढील चाचणी सरकारी प्रमाणित प्रयोगशाळेत करू, असे मनोज सचान म्हणाले.