मोदींचा लाखमोलाचा सूट खरेदी करणाऱ्या हिरे व्यापाऱ्याला कोटीचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 06:24 AM2019-04-27T06:24:15+5:302019-04-27T06:24:36+5:30
गंडा घालणारे कोशिया बंधू फरार
सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाखमोलाचा सूट २०१५ मध्ये एका जाहीर लिलावात ४ कोटी ३१ लाख रुपयांत विकत घेणारे सुरतचे हिरे व्यापारी लालजीभाई पटेल यांना दोन भावांनी एक कोटी रुपयांना गंडविल्याचे उजेडात आले आहे.
धर्मानंद डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन लालजीभाई पटेल हे २०१५ मध्ये मोदींचा किमती सूट खरेदी केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. हिंमत आणि विजय कोशिया बंधूंनी पैलू न पाडलेले हिरे मागच्या वर्षी उधारीवर खरेदी केले होते. त्या हिऱ्यांची किंमत चुकती न करता या दोघांनी लालजीभाई पटेल यांच्या कंपनीला फसविले. याप्रकरणी २२ एप्रिल रोजी सुरतमधील कटारगाम पोलीस ठाण्यात धर्मानंद डायमंड्सचे व्यवस्थापक कमलेश केवडिया यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
कोशिया बंधूंचा पत्ताच लागत नाही. कटारागाममधील त्यांच्या कार्यालयाला टाळे असल्याचे आढळले, असे केवडिया यांनी पोलिसांना सांगितले. कोशिया बंधूंनी यापूर्वीही अन्य डायमंड कंपन्यांना गंडविलेले आहे. तक्रार दाखल करून चौकशी सुरू
करण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक झेड. एन. घासुरा यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
कोशिया बंधूंनी धर्मानंद डायमंड्स कंपनीचा विश्वास संपादित करून आॅक्टोबर २०१८ मध्ये १,५०० कॅरेटस वजनाचे पैलू न पाडलेले हिरे घेतले होते. या हिºयांची किंमत १ कोटी आहे. हे दोन्ही भाऊ फरार आहेत. हिरे उद्योगाच्या नियमातहत १२० दिवसांत पैसे चुकते करण्याची हमी कोशिया बंधंूनी दिली होती. तथापि, हा अवधी संपल्यानंतर व्यवस्थापक केवडिया यांनी त्यांना पैसे देणे बाकी असल्याची आठवण करून देण्यासाठी फोन केला; परंतु दोघांचे मोबाईल फोन बंद होते, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.