कोविन ॲपचा डेटा लीक, सरकार म्हणते... नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 14:26 IST2023-06-13T14:26:35+5:302023-06-13T14:26:48+5:30
तृणमूल नेत्याच्या दाव्यानंतर खळबळ

कोविन ॲपचा डेटा लीक, सरकार म्हणते... नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या कळात सरकारी कोविन ॲपचा वापर करून सर्वांनीच कोरोनावरील लस, बूस्टर डोस घेतले. आता याच कोविन ॲपचा डेटा फुटल्याचा दावा तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. परंतु, सरकारने असे काहीही झाले नसल्याचे स्पष्ट केले.
आपला दावा सिद्ध करण्यासाठी गोखले यांनी अनेक स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. यामध्ये लोकांचे नाव-पत्ता, मोबाइल, आधार, मतदार ओळखपत्र आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती समाविष्ट आहे.
कुणाचा डेटा लीक?
गोखले यांनी दावा केला की, राज्यसभा खासदार आणि टीएमसी नेते डेरेक ओब्रायन, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, काँग्रेस नेते जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल, आरोग्य सचिव राजेश भूषण, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राज्यसभा खासदार सुष्मिता देव, अभिषेक मनू सिंघवी आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत, पत्रकार राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, राहुल शिवशंकर यांच्या नावांचा समावेश आहे.