"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 11:49 AM2024-02-28T11:49:28+5:302024-02-28T12:02:18+5:30
अमित शाह यांचं विधान हास्यास्पद असून इंडिया आघाडीत कुठली घराणेशाही आहे?, खरी घराणेशाही तर भाजपामध्येच आहे
मुंबई - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान काँग्रेसच्या घराणेशाहीवर भाष्य केले. यावेळी, त्यांनी इंडिया आघाडीच्या पक्षातील नेत्यांवरही जोरदार प्रहार केला. त्यामध्ये, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंसह, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांच्यावरही घराणेशाहीवरुन निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे, असे म्हणत अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य केलं. त्यावर, आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
अमित शाह यांचं विधान हास्यास्पद असून इंडिया आघाडीत कुठली घराणेशाही आहे?, खरी घराणेशाही तर भाजपामध्येच आहे. जय शाह यांनी विराट कोहलीपेक्षा जास्त षटकार मारले होते का?, जय शाह यांनी सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले होते का?, जय शाह यांनी कपिल देवपेक्षा जास्त क्रिकेट खेळलं आहे का, ज्यामुळे त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव केले, असे सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, जर अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह बीसीसीआयचे सेक्रेटरी बनले असते का, असेही राऊत यांनी म्हटले.
घराणेशाही असेलल्या कुटुंबालाही मोठी प्रतिष्ठा असावी लागते आणि ठाकरे कुटुंबाला देशात आणि महाराष्ट्रात मोठी प्रतिष्ठा आहे. ठाकरे कुटुंब आभाळातून पडलं नाही. महाराष्ट्र, देश आणि भाजपासाठी मोठं योगदान ठाकरे कुटुंबाचं आहे. या ठाकरे कुटुंबाचा फायदा, भाजपाला झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही झाला आहे, असे राऊत यांनी म्हटले. तसेच, शरद पवार यांची कन्या लोकसभेत काम करते, मग ती मुख्यमंत्री कशी होईल. शरद पवार यांचं देशाच्या कृषी क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यामुळेच, तुमच्याच सरकारने त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केल्याचंही राऊत यांनी अमित शाह यांना उत्तर देताना म्हटले.
काय म्हणाले होते अमित शाह
अमित शाह यांनी म्हटले की, विरोधकांची आघाडी ही केवळ सत्तेसाठी एकत्र आलेत. ज्यांना आपल्या मुलाला, मुलीला, जावयाला मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान करावं यासाठी एकत्रित आलेत. कुणालाही देशाची चिंता नाही. मुलाने मुख्यमंत्री बनावं हे उद्धव ठाकरेंचं लक्ष्य आहे. मुलगा, मुलगी, जावई, भाचे यांना सत्तेच्या पदावर बसवण्याच्या स्वार्थी हेतूने जमलेल्या पक्षांची टोळी आहे असं त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ च्या ग्लोबल समिटमध्ये शाह यांची मुलाखत झाली. त्यात ते बोलले.