भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 10:52 AM2024-09-21T10:52:48+5:302024-09-21T11:05:44+5:30
नितीन गडकरी आणि मोदी-शाह यांच्यातील संबंधांची सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. त्यात एका मुलाखतीत गडकरींनी त्यावर स्पष्ट भाष्य केले आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जेव्हा पक्षाचे अध्यक्ष होते, तेव्हा ते अमित शाहांना भेटीसाठी वाट बघायला लावायचे असं बोललं जातं, हाच प्रश्न एका मुलाखतीत पत्रकाराने थेट नितीन गडकरींना विचारला. तुम्ही जेव्हा पक्षाचे अध्यक्ष होता, तेव्हा अमित शाहांना वाट बघायला लावायचा. मोदी एकमेव मुख्यमंत्री होते जे तुम्ही पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर भेटीला आले नाहीत. तुमचे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी संबंध कसे आहेत असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला.
या प्रश्नाचे नितीन गडकरींनी उत्तर देत म्हटलं की, नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला यश मिळे आणि देशासाठी त्यांच्या विचाराने जितकं शक्य असेल तितकं आम्ही योगदान देऊ असं त्यांनी सांगितले. त्याशिवाय माझ्या कार्यालयात १००-१०० लोक भेटायला येतात. आज तुम्ही भेटायला आलात, तुम्हाला जास्त वेळ द्यायचा होता. त्यामुळे छोट्या व्यक्तींची कामे लवकर उरकून घेतली. मोठ्या लोकांना जास्त वेळ द्यायला लागायचा त्यामुळे वाट पाहावी लागते. तुम्हालाही आज पोहे खाऊन बसावं लागलं, परंतु माझा हेतू त्यामागे खराब नव्हता असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.
तसेच मी कुणी मोठा व्यक्ती नाही. मी पोस्टर चिपकवण्याचे काम केले आहे. पक्षात पावती वाटप करण्याचं काम केलंय. मी कधीही बायोडाटा छापला नाही. मागील ४५ वर्षात एअरपोर्टवर ना माझ्या स्वागतासाठी ना मला निरोप देण्यासाठी कुणी येते. निवडणूक जिंकल्यानंतरही माझ्या सत्काराचा कार्यक्रम होत नाही कारण हे मला आवडत नाही. मी जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी यांना माझे आदर्श मानतो. संघ आणि विद्यार्थी परिषदेतून मला चांगले संस्कार मिळाले आहेत. माझ्यात जे काही चांगले दिसतंय ते त्यामुळे आहे असं नितीन गडकरींनी सांगितले.
दरम्यान, मी देश, समाज घर आणि कुटुंबासाठी काम करत राहतो. माझं वृत्तपत्र वाचणं जवळपास बंद झालंय. टीव्हीही फार कमी वेळ पाहतो. मी अधिकाधिक युट्यूबवर हिंदी आणि मराठी गाणी ऐकतो. मला गझल ऐकायला आवडते. लकी अलीचे गाणेही मी ऐकतो. मला कुणाशी देणे घेणे नाही. जोपर्यंत जनतेला वाटेल तोपर्यंत मी काम करेल नाहीतर गपचुप माझ्या घरी निघून जाईल असं नितीन गडकरींनी म्हटलं.