जेएनयू कॅम्पसमधील सुरक्षा व्यवस्था बिघडली का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 04:45 AM2020-01-07T04:45:59+5:302020-01-07T04:46:17+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) विद्यार्थ्यांच्या गटांत हाणामाऱ्या झाल्यानंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेच्या मोठ्या घोषणा होतात.
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) विद्यार्थ्यांच्या गटांत हाणामाऱ्या झाल्यानंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेच्या मोठ्या घोषणा होतात. जेएनयु परिसरात नऊ फेब्रुवारी, २०१६ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता ‘भारत तेरे टुकड़े होंगे, ‘अफजल हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं।’ अशा देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. संपूर्ण देशात ही चर्चा झाली की, जेएनयुत देशविरोधात कारवाया का होतात? त्यांच्यावर नजर का ठेवली जात नाही? या वादात विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमार याची बरीच चर्चा झाली. विद्यापीठ परिसरात त्या रात्री अभाविप व डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांत बरीच मारामारी झाली.
कन्हैया कुमार प्रकरणापासून ते चेहरे झाकलेल्या गुडांनी केलेले हल्ले यात जेएनयुत काय बदल झाला? कन्हैया प्रकरणानंतर जेएनयु प्रशासनाने दिल्ली उच्च न्यायालयात मे २०१७ मध्ये एक शपथपत्र दाखल करून आम्ही कॅम्पसमध्ये सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी ६०० सीसीसीटीवी कॅमेरे बसवू, असे म्हटले होते. प्रत्यक्षात १०० देखील कॅमेरे लागलेले नाहीत.
बहुतेक हाणामाºया विद्यापीठाच्या वसतिगृहांत होतात. विद्यापीठाच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयाने ‘लोकमत’ ला सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास आमचा खासगीपणा राहणार नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार होती. न्यायालयाचेही म्हणणे होते की, परिसरात कॅमेरे लावताना विद्यार्थ्यांचा खासगीपणा सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. यात हे ठरले की, शाखा आणि अभ्यास केंद्रात सीसीसीटी कॅमेरे लावले जावेत. शाळेबाहेर सीसीसीटीव्ही कॅमेरे लावलेही गेले होते. परंतु, विद्यार्थ्यांनी ते फोडून टाकले होते.