सिलिंडरवरील एक्स्पायरी डेट केली का चेक? कशी समजते सिलिंडरची एक्स्पायरी डेट? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 06:49 AM2024-04-03T06:49:30+5:302024-04-03T06:51:57+5:30
Gas Cylinder: सिलिंडरची एक्स्पायरी डेट तपासण्याच्या फंदात फारसे कुणी पडत नाही. परंतु हे धोक्याचे आहे. ही तारीख तपासून घेणे गरजेचे आहे.
नवी दिल्ली - गॅस संपताच नव्या सिलिंडरसाठी ऑर्डर दिली जाते. कितीही घाईगडबड असली तरी लोक सिलिंडर कुठे लीक तर झालेला नाही ना याची खातरजमा करून घेतात. त्याचे वजन तपासले जाते परंतु सिलिंडरची एक्स्पायरी डेट तपासण्याच्या फंदात फारसे कुणी पडत नाही. परंतु हे धोक्याचे आहे. ही तारीख तपासून घेणे गरजेचे आहे.
कशी समजते सिलिंडरची एक्स्पायरी डेट?
- अक्षरे सिलिंडरच्या मुदतबाह्य होणारा महिना दर्शविते आणि अंकातून कोणत्या वर्षी मुदतबाह्य होणार हे दर्शवितात.
- १२ महिन्यांची विभागणी चार गटांमध्ये करून त्यांना अनुक्रमे ए, बी, सी आणि डी अशी नावे दिली जातात.
यासाठी कुठे पाहायचे?
सिलिंडर नीट निरखून पाहिला असाल तर त्यावर तीन पट्ट्या असतात. त्यावर ए-२३, बी-२४ किंवा सी-२५ असे नंबर लिहिलेले असतात. या क्रमांकांवरूनच ए-२४ चा अर्थ असा आहे की सिलिंडर २०2४ या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान एक्स्पायर होईल. डी-२७ चा अर्थ असा की सिलिंडर २०२७ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदतबाह्य होईल.
या महिन्यात होणार अयोग्य
ए : जानेवारी ते मार्च
बी : एप्रिल ते जून
सी : जुलै ते सप्टेंबर
डी : ऑक्टोबर ते डिसेंबर
सिलिंडरचे लाइफ किती असते?
सामान्यपणे एका एलपीजी गॅस सिलेंडरची लाईफ १५ वर्षे इतकी असते. वापरात असताना सिलिंडर दोनवेळा तपासणीसाठी पाठवला जात असतो. पहिली चाचणी १० वर्षे तर दुसरी त्यानंतर ५ वर्षांनी केली जात असते.
तपासणीवेळी सिलिंडरची हायड्रो टेस्ट केली जाते. पाच पट प्रेशरने तो टिकेल का हे तपासले जाते. चाचणीत अयोग्य आढळल्यास सिलिंडर नष्ट केला जातो.