हिंसाचार पसरवण्यासाठी मिळाला होता पैसा?; शरजीलच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:15 PM2020-02-04T12:15:08+5:302020-02-04T12:16:02+5:30
जामियाप्रकरणी शरजील इमामलाही अटक केली जाऊ शकते. तपासादरम्यान, पोलिसांना शरजीलच्या लॅपटॉपवरून असे अनेक पुरावे सापडले की त्यांनी सीएएविरूद्ध लोकांना आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले
नवी दिल्ली - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केलेल्या शरजील इमामच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. या जेएनयू विद्यार्थ्याच्या रिमांडला तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांच्या चौकशी दरम्यान तो सतत गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरं देत आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) चे लोक शरजीलच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र हे लोक पीएफआयशी संबंधित आहेत त्याची त्याला माहिती नाही असा दावा शरजीलने केला आहे.
तीन दिवसांच्या रिमांड दरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शरजीलच्या जवळील 10-12 लोकांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावलं आहे. या सर्वांची बुधवारी चौकशी केली जाऊ शकते. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या चौकशीत जमाव भडकवण्यासाठी आणि हिंसाचार पसरविण्यासाठी देशभरात उघडलेल्या पीएफआयच्या 73 बँक खात्यांमध्ये १२० कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. म्हणूनच सीएए आणि एनआरसीच्याविरोधात हिंसा पसरवण्यामागे पीएफआयची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या बँक खात्यात कोणताही संशयास्पद व्यवहार नाही
शाहीन बागेत त्याचे कार्यालय आहे. यूपी पोलिसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा पीएफआयच्या दृष्टीने तपास करत आहे. शरजीलच्या बँक खात्यात सध्या पोलिसांना कोणतेही संशयास्पद व्यवहार आढळलेले नाहीत. शरजीलपासून जप्त केलेला लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल, पुस्तके आणि पत्रके सापडल्याचा धक्कादायक पुरावा सापडल्याचा दावा गुन्हे शाखेने केला आहे.
जामिया हिंसाचारात शरजीलचा हात
त्याच्या लॅपटॉपमधून १५ डिसेंबर रोजी जामिया आणि न्यू फ्रेंड्स कॉलनी भागातील हिंसाचारापूर्वी सीएए आणि एनआरसीविरूद्ध उर्दू, इंग्रजी भाषेत एक वादग्रस्त पोस्टर तयार केले होते, जे सर्व विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये पाठवण्यात आले. या पत्रकाला आजूबाजूच्या मशिदींमध्येही वाटण्यात आलं. पोलीस सर्व मोबाइल ग्रुपचा आढावा घेत आहे. आणि त्यांचे चॅटिंग वाचत आहे. शरजीलने मोबाईलमधील डिलीट केलेला डेटाही परत मिळाला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामियाप्रकरणी शरजील इमामलाही अटक केली जाऊ शकते. तपासादरम्यान, पोलिसांना शरजीलच्या लॅपटॉपवरून असे अनेक पुरावे सापडले की त्यांनी सीएएविरूद्ध लोकांना आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले. त्याच्या लॅपटॉपमधून अनेक पत्रके जप्त करण्यात आली आहेत, ज्यात सीएए आणि एनआरसीबद्दल खोटी माहिती पसरली जात आहे. त्याने १४ डिसेंबर रोजी जामिया भागात ही वादग्रस्त पत्रके वाटप केली आणि त्यानंतर १५ डिसेंबर रोजी त्या भागात हिंसाचाराची घटना घडली. त्याच्या व्हाट्सएप ग्रुपवरून अनेक संशयास्पद लोकांचीही ओळख पटली आहे अशी माहिती आहे.