आपण यांना पाहिलत का? अमेठीत राहुल गांधींचा शोध घेणारी पोस्टर्स
By Admin | Published: March 25, 2015 12:21 PM2015-03-25T12:21:54+5:302015-03-25T13:27:35+5:30
गेल्या महिन्याभरापासून अज्ञातवासात गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा शोध घेण्यासाठी अमेठीकर पुढे सरसावले असून अमेठीचे खासदार बेपत्ता असल्याची पोस्टर्स शहरात झळकली आहेत.
>ऑनलाइन लोकमत
अमेठी, दि. २५ - गेल्या महिन्याभरापासून अज्ञातवासात गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा शोध घेण्यासाठी अमेठीकर पुढे सरसावले असून अमेठीचे खासदार बेपत्ता असल्याची पोस्टर्स शहरात झळकली आहेत. बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, शाळा तसेच अनेक चौकात ही पोस्टर्स सध्या दिसत असून राहुल गांधी नेमके गेलेत कुठे असा प्रश्न मतदारांनी विचारला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी सुट्टीवर गेले आहेत. मात्र ते कोठे आहेत याबाबत कोणालाच कसलीही माहिती नाही. ते मार्चअखेर परत येणार असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात येत असले तरी त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल नेमकी माहिती मिळत नसल्याने विविध प्रश्नांना ऊत आला आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी आता त्यांच्याच मतदारसंघात 'खासदार बेपत्ता' अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. संसद अधिवेशनाच्या काळातच राहुल गांधी सुट्टीवर असल्याने अमेठीतील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्याची यादीही पोस्टर्सवर छापण्यात आली असून राहुल गांधीना शोधून दाखवल्यास योग्य इनामही मिळेल, असेही त्यात म्हटले आहे. तर काही पोस्टर्सवर 'जाने वो कौनसा देस, जहाँ तुम चले गये' अशा उपरोधिक ओळीही छापण्यात आल्या आहेत. देशासह अमेठीच्या जनतेलाही राहुल यांची गरज असल्याचे त्यात म्हटले आहे.
राहुल गांधी महिन्याभरापासून अधिक काळ सुट्टीवर असून त्यांच्या अज्ञातवासाबद्दल सताधा-यांकडून टीका करण्यात येत असल्याने तणाव निर्माण झालेला असतानाच आता या पोस्टर्समुळे त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.