गटारं अन् शौचालये स्वच्छ करण्यासाठी खासदार झालो नाही : प्रज्ञा सिंह ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 07:45 AM2019-07-22T07:45:50+5:302019-07-22T07:46:15+5:30
भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात.
भोपाळ : भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असाच वाद ओढावून घेणारं विधान केलं आहे. गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झाली नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनीही साध्वींवर टीका केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाची साध्वींनी एक प्रकारे खिल्ली उडवल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मध्य प्रदेशातील सिहोर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आम्ही गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. ज्यासाठी आम्हाला खासदार म्हणून जनतेनं निवडून दिलं आहे, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू.
तत्पूर्वी मुंबईवर झालेल्या 26/11 हल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात अनेक स्तरातून टीका झाली होती. हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना मी सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला," असे धक्कादायक विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या या विधानामुळे भाजपा अडचणीत आली होती. तर दुसरीकडे दक्षिणेतील अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असा दावा केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे विधान केले होते.
मात्र नथुरामबाबतच्या वक्तव्यामुळे वाद वाढल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागितली होती. 'हे माझं वैयक्तिक मत आहे. मी रोड शोमध्ये होते त्यावेळी जाताना मी हे उत्तर दिलं आहे. माझ्या भावना तशा नव्हत्या. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं आहे ते विसरता येणार नाही. मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचं पालन करते. जी पक्षाची भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे' असे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागताना म्हटले होते.